परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९० पासून अध्यात्मप्रसाराचे कार्य चालू केले. त्या अंतर्गत त्यांनी ‘आनंदप्राप्तीसाठी साधना’, या विषयावर अभ्यासवर्ग घेणे, विविध ग्रंथांचे संकलन करणे, अनेक मोठी प्रवचने करणे’, असे विविध मार्ग अवलंबले आहेत. आरंभापासून ‘जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन करणे आणि ‘चांगला साधक कसे व्हावे ?’, याविषयी मार्गदर्शन करणे’, हा त्यांच्या कार्याचा एकमेव उद्देश होता. ‘साधकांच्या साधनेसंबंधी अडचणी समजून घेणे आणि त्यांचे निराकरण करून उपाय सांगणे’, हे त्यांच्या कार्याचे एक अविभाज्य अंग आहे. ‘बाळ बोबडे जरी बोले, बोल जननीस ते कळे ।’, या उक्तीप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साधकांच्या साधनेसंबंधी अडचणी लगेच कळतात आणि ते त्यांना अचूक उपायही सांगतात’, अशी अनुभूती अनेक साधकांनी घेतली आहे. या लेखात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध ठिकाणी केलेल्या मार्गदर्शनातील काही निवडक सूत्रे दिली आहेत.
(भाग १)

१. ‘साधकांच्या स्वभावदोषांमुळे त्यांच्याकडून गंभीर चुका झाल्याने त्यांची साधनेत आणखी हानी होऊ नये’, यासाठी साधकांना घरी पाठवले जाते !
एक साधक : साधकांना आश्रमातून घरी का पाठवले जाते ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘साधकांना साधना करणे सुलभ जावे आणि त्यासाठी पूरक असे वातावरण त्यांना मिळावे’, यासाठी सनातनच्या आश्रमांची निर्मिती केली आहे. आश्रमात आलेल्या साधकांना येथील चैतन्य आणि सात्त्विकता यांचा लाभ होऊन त्यांची जलद गतीने आध्यात्मिक उन्नती होते.
आश्रमातील काही जणांकडून साधनेचे अपेक्षित असे प्रयत्न होत नाहीत. त्यांच्यातील तीव्र स्वभावदोषांमुळे त्यांच्याकडून गंभीर चुका होतात. ‘त्यांच्या स्वभावदोषांमुळे आश्रमातील पावित्र्य आणि सात्त्विकता न्यून होऊन त्याचे पाप त्यांना लागू नये, तसेच त्यांच्या साधनेची आणखी हानी होऊ नये, त्यांनी घरी राहून व्यष्टी साधना करावी’, यासाठी त्यांना घरी पाठवले जाते.
अनेकदा असे झाले आहे की, साधकांना घरी पाठवल्याने त्याचा त्यांना लाभ झाला आहे. घरी गेल्यानंतर त्यांच्यात चुकांविषयी खंत निर्माण झाली, त्यांच्यातील व्यष्टी साधनेचे प्रयत्न करण्याची आणि स्वतःला पालटण्यासाठी तळमळ वाढल्यावर त्यांनी साधनेचे प्रयत्न चालू केले आहेत.
२. ‘काही जणांनाच आश्रमातून घरी का पाठवले जाते ?’, याचा साधकांनी अंतर्मुख होऊन विचार करावा !
एक साधक : साधकांना आश्रमातून घरी पाठवल्यामुळे त्यांच्या मनात विकल्प येतात. त्यासंदर्भात कसे विचार असायला हवेत ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : शेकडो साधक आश्रमात राहून साधना करतात. सनातनच्या आश्रमात साधना सोडून दुसरा विषयच नाही. आश्रमात ‘साधना करणे आणि ती समाजाला शिकवणे’, हेच असते. मग ‘काही जणांनाच घरी का पाठवले ?’, याचा त्यांनी अंतर्मुख होऊन विचार करायला पाहिजे.
आपल्या मनात काही विकल्प आल्यास त्याविषयी कुणाला तरी विचारायला हवे. बर्याच संतांचे सहस्रो भक्त असतात; पण त्यांतील किती जण आध्यात्मिक प्रगती करत आहेत ? सहस्रो साधक गुरुकृपायोगानुसार साधना करत आहेत आणि मुख्य म्हणजे आध्यात्मिक प्रगती करत आहेत. ‘आपल्याला ‘मला असे वाटते’, ‘असे का ?’, यांत अडकायचे नाही. पुढे जायचे आहे’, हे लक्षात घ्यायला हवे.
३. ‘मला ईश्वरप्राप्ती करायची आहे’, या निश्चयाने साधनेचे प्रयत्न केल्यास चुका होत नाहीत !
एक साधिका : काही वर्षांपूर्वी काही साधकांकडून चुका झाल्यामुळे त्यांना व्यष्टी साधना करण्यासाठी आश्रमातून घरी जाण्यास सांगितले. तेव्हा ते तरुण होते. त्यामुळे त्यांना नोकरी किंवा काम मिळू शकले; पण आता काही मध्यमवयीन साधक आश्रमात आले आणि त्यांच्याकडून काही चुका झाल्या अन् त्यांना जर घरी जाण्यास सांगितले, तर आता त्यांना नोकरी मिळणे शक्यच नाही. अशा वेळी त्यांनी काय करावे ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ‘मला ईश्वरप्राप्ती करायची आहे’, असा आपला निश्चय असला की, आपल्याकडून चुका होत नाहीत. ईश्वर प्रत्येक वेळी आपल्याला साहाय्य करतो. प्रत्येक गोष्ट इतरांना विचारून करायची. विचारून केले, तर चूक कशी होईल ? आपण साधकांनी सांगितल्याप्रमाणे केले, तर आपली साधना होते. साधकांनी आपली चूक सांगितली, तर ती स्वीकारायची. आश्रमात शेकडो साधक आहेत. त्यांना हे जमते, तर तुम्हाला का जमू नये ?
आश्रमात २४ घंटे सात्त्विक वातावरण असते. आपण घरी राहिलो की, आपल्या मनात मायेतले काही ना काही विचार चालूच असतात, मायेतील बोलणे होते. आपल्या सभोवती नातेवाईक, तसेच शेजारी-पाजारी असतात. आश्रमात केवळ साधना करणारे साधक असतात.
(क्रमशः)