१२ मार्च या दिवशी सकाळी दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचत होते. वाचतांना काही वृत्ते अशी होती की, ज्यातून हिंदु जागृत होत असल्याचे पाहून सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याप्रती कृतज्ञता भाव दाटून आला. गेल्या ३० वर्षांतील धावते समालोचनच जणू डोळ्यांपुढे आले. त्याविषयीची सूत्रे येथे देत आहे.
१. धर्मविषयक जागृती नसणारे हिंदू
वर्ष २०२५ ला आरंभ झाला आणि हिंदूंमध्ये धर्मविषयक जागृती वाढत असल्याचे दर्शवणारी अनेक वृत्ते अधिक प्रमाणात वाचनात येऊ लागली. यापूर्वी अशा प्रकारच्या वृत्तांचे प्रमाण नगण्य होते. अगदी गत एक-दोन वर्षांपर्यंत म्हणजे वर्ष २०२३-२०२४ पर्यंत हिंदू केवळ ‘मार खाणे, रडत बसणे’ एवढेच करतांना दिसत होते. हिंदुजनांवर अथवा हिंदु धर्मावर कितीही अन्याय झाला, आघात झाले, तरीही हिंदू निद्रिस्तच ! ही स्थिती सर्वत्र होती.

२. धर्माला आलेली अवकळा आणि त्यावर योग्य उपाययोजना करणारे कुणीही नसणे
याची कारणेही अनेक आहेत. हिंदु इंग्रजाळलेले, पाश्चात्त्यांचे अनुकरण करणारे, अधर्माचरणी, असंघटित, एकमेकांचे पाय ओढणारे, लाचलुचपतखोर आणि त्यांचे तथाकथित पुढारीही तसेच – धर्मांधांचे लांगूलचालन करणारे, धर्मांधधार्जिणे ! स्वतःच्याच धर्माचे लचके तोडणारे ! अन्य धर्मियांच्या विरोधात ‘ब्र’ही न काढणारे ! धर्माला आलेली ही अवकळा पाहून त्याच्या मुळाशी जाऊन कारणे शोधणारे आणि त्यावर योग्य उपाययोजना करणारे कुणीच नव्हते. जे काही थोडेफार करू शकणारे होते, ते विघटित आणि असंघटित होते.
३. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी लोकांमध्ये धर्मजागृती करण्याचा संकल्प करणे
अशा स्थितीत लोकांमध्ये धर्मजागृती करण्यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी पाऊल उचलले. खरेतर फार कठीण होते ते; पण धीरोदात्तपणे लोकांमध्ये धर्मविषयक जागृती करण्याचा संकल्प त्यांनी केला. हिंदूंना आणि हिंदु धर्मासाठी लढणार्या एकांड्या शिलेदारांना संघटित करण्याचे जणू शिवधनुष्य त्यांनी पेलले. हे कार्य त्यांनी कुठेही, काहीही घाईगडबड न करता वा उतावीळ न होता अत्यंत धीरोदात्तपणे आणि कुशलतेने, तसेच अतिशय नियोजनबद्ध अन् शिस्तबद्ध रितीने केले.
४. धर्मावरील आघात आणि ‘समाज सात्त्विक पाहिजे’ हे विषय बिंबवणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी आरंभी ‘व्यक्तींची वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती आणि ईश्वरी राज्याची स्थापना’ हे ध्येय ठेवून सनातन संस्थेची स्थापना केली. त्या माध्यमातून गावोगावी जाऊन लोकांना ईश्वरभक्तीकडे वळवण्यास आरंभ केला. लोकांमध्ये ‘समाज सात्त्विक का पाहिजे ?’, याची आवश्यकता बिंबवणे चालू केले. त्याचसमवेत धर्मावरील आघात आणि अन्याय यांच्या विरोधात लढण्यासाठी अन् स्वसंरक्षण प्रशिक्षणाची अन् लढाऊवृत्तीची आवश्यकताही प्रतिपादित केली.
५. वर्ष २००२ पासून धर्मजागृती आणि हिंदूसंघटन यांचे कार्य अव्याहतपणे चालू असणे
वर्ष २००२ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रेरणेने हिंदु जनजागृती समितीची स्थापना झाली. धर्मसभा आणि धर्मशिक्षणवर्ग यांच्या माध्यमातून भारतभराच्या जनमानसात
धर्म-जागृती अन् संघटन यांचे बीज पेरले. स्वतःसमवेत अन्य संघटनांना जोडले. पुढे अल्पावधीतच अखिल भारतीय हिंदु अधिवेशन, वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव आदींच्या माध्यामातून विविध हिंदु संघटनांना आणि हिंदूंना एकत्र करण्याचे कार्य केले. गेली २३ वर्षे हे कार्य अव्याहतपणे चालूच आहे.
६. हिंदु संघटनांमध्ये एकमेकांच्या कार्याप्रती आदरभाव इत्यादी मूल्ये रुजवणे
या अधिवेशनांच्या आणि महोत्सवांच्या माध्यमातून त्यांनी हिंदूंमध्ये धर्मजागृती केली. सर्व बाजूंनी लचके तोडले जात असलेल्या हिंदु धर्मासाठी विविध संघटना आपापल्या कार्यक्षेत्रात जे कार्य करत होत्या, त्यांना एका मंचावर आणले आणि योग्य दिशा दिली. संघटितपणाचे आणि साधनेचे महत्त्व पटवून दिले. सनातन संस्थेशी जोडल्या गेलेल्या अन्य हिंदु संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये शिस्त, कायद्याच्या चौकटीत राहून वैध मार्गाने आंदोलने करणे, एकमेकांप्रती आणि एकमेकांच्या कार्याप्रती आदराची भावना इत्यादी मूल्ये रुजवली.
७. धर्मजागृती आणि संघटन यांचे बीज अंकुरले असून त्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर होणे
हळूहळू ते धर्मजागृतीचे आणि संघटनाचे बीज अंकुरले, फोफावले अन् आता त्याचा विशाल वटवृक्ष झाला आहे. त्या धर्मसंघटनरूपी विशाल वटवृक्षाच्या फांद्या आता दुष्प्रवृत्तींचा प्रतिकार करण्यासाठी वेगाने हलू लागल्या आहेत. अन्यायाविरुद्ध आवाज उठवू लागल्या आहेत. ते पाहून असे वाटते की, गुरुदेवांनी केलेला संकल्प पूर्णत्वाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे.
८. गुरुदेवांचा हिंदूसंघटन आणि धर्मजागृती यांचा वटवृक्ष बहरतांना पाहून भाव जागृत होणे
सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या या कार्यसंकल्पाचे फलित म्हणून आज राजकीय नेतेही हिंदु धर्मासाठी कृतीशील होऊ लागले आहेत. धर्मासाठी काहीतरी करण्याकरता पावले उचलू लागले आहेत. काहींना प्रत्यक्ष कृती करण्यास अवधी लागणार असला, तरी किमान धर्मावर होणार्या अन्यायाविरुद्ध बोलू तरी लागले आहेत. हे जसे पुढार्यांच्या, विविध हिंदु संघटना यांच्याविषयी घडू लागले आहे, तसेच लहान लहान गावांतही हिंदूंमधील संघटितपणा आणि धर्मविषयक जागृती होऊ लागली आहे. प्रतिदिन वृत्तपत्रांमध्ये छापून येणारी वृत्ते त्याचेच द्योतक आहेत. हिंदु हळूहळू जागा होत आहे, याचा आनंद होत आहे. गुरुदेवांचा हा हिंदूसंघटन आणि धर्मजागृतीचा वटवृक्ष अशा प्रकारे बहरतांना पाहून अन् दैनिक ‘सनातन प्रभात’मधून अनुभवतांना पाहून कृतज्ञता भाव जागृत होत आहे.
हिंदु जागृतीचे शिवधनुष्य पेलले पेलले ।
धर्मजागृतीचे बीज रोवले ।।
अहो, देखादेखी ते अंकुरले ।
संकल्पकृपेने तयांच्या बहरले बहरले ।।
विशालवृक्ष रूप बिजाचे जाहले ।
पाहुनी तया मन गहिवरले गहिवरले ।।
धन्य ते गुरुदेव डॉ. आठवले ।
धन्य धन्य ते गुरुदेव डॉ. आठवले ।।
धर्मजागृतीच्या छोट्याशा बिजाचे ज्यांच्या संकल्पकृपेने विशाल वटवृक्षामध्ये रूपांतर झाले, धन्य ते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
– श्रीमती अलका वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.३.२०२५)