खामगाव तालुक्यात (बुलढाणा) होळीच्या दिवशी डीजे वाजवण्यावरून झालेल्या वादाचे दंगलीत रूपांतर !

२ समाजांत दगडफेक, ३६ जणांवर गुन्हा नोंद, २२ जण कह्यात !

प्रतिकात्मक चित्र

 

(डीजे म्हणजे मोठा आवाज करणारी ध्वनीवर्धक यंत्रणा)

बुलढाणा – येथील खामगाव तालुक्यातील आवर गावात होळीच्या दिवशी डीजे वाजवण्यावरून २ गटांमध्ये हिंसक झटापट झाली. हा वाद काही वेळातच हिंसाचारात पालटला आणि नंतर दगडफेकही झाली. यामध्ये ७ जण घायाळ झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी घटनास्थळी आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दंगलरोधक पथकाला पाचारण करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ३६ जणांवर गुन्हा नोंद केला असून २२ जणांना कह्यात घेतले आहे. गावात तणावाचे वातावरण आहे; मात्र परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.