
अमरावती (आंध्रप्रदेश) – विद्यार्थ्यांना चांगले शिकवूनही विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा होत नाही, हे पाहून आंध्रप्रदेशातील एका मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना शिक्षा देण्याऐवजी स्वतःलाच शिक्षा दिल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आंध्रप्रदेशातील विजयनगरम् जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली आहे. मुख्याध्यापक चिंता रमण यांनी विद्यार्थ्यांच्या वाईट कामगिरीला कंटाळून हे पाऊल उचलले. ‘मुलांना शिकवण्यात आपणच कुठे तरी अल्प पडत आहोत’, असे सांगत या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांसमोर उठाबशा काढल्या. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमावर प्रसारित होत आहे.
मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांसमोर कानाला पकडून ५० उठाबशा काढल्या. मुख्याध्यापक ज्यावेळी उठाबशा काढत होते त्या वेळी विद्यार्थी एकमेकांकडे पहात होते. काही विद्यार्थ्यांनी ‘असे करू नका’, अशी विनंतीसुद्धा मुख्याध्यापकांना केली; परंतु मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत उठाबशा काढणे चालूच ठेवले. मुख्याध्यापकांच्या या कृतीने उपस्थित असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना लाज वाटली.
संपादकीय भूमिकाविद्यार्थ्यांना शिकवणे हे शिक्षकाचे कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित पालट दिसत नाही, तर या कर्तव्यपालनात आपण कुठे अल्प पडलो, यावर चिंतन-मनन करून शिक्षकाने आवश्यक पालटासह विद्यादानाचे काम चालू ठेवले पाहिजे. स्वत:ला शिक्षा करून ही समस्या सुटणार नाही; उलट शिक्षकच कर्तव्यपालनात अल्प पडल्याचा ठपका बसेल ! |