पौष मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

साप्ताहिक शास्त्रार्थ

‘१४.१.२०२१ या दिवसापासून पौष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

१. हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२, उत्तरायण, हेमंतऋतू, पौष मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे.

(संदर्भ : दाते पंचांग)

२. शास्त्रार्थ

सौ. प्राजक्ता जोशी

२ अ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते. त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. १७.१.२०२१ या दिवशी सकाळी ८.०९ पर्यंत आणि २०.१.२०२१ या दिवशी दुपारी १.१५ पासून उत्तररात्री २.३२ पर्यंत विष्टी करण आहे.

२ आ. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. १८.१.२०२१ या दिवशी सकाळी ९.१४ पासून १९.१.२०२१ सकाळी ९.५५ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.

२ इ. बांगरषष्ठी : पौष शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीला ‘बांगरषष्ठी’ म्हणतात. १९.१.२०२१ या दिवशी बांगरषष्ठी आहे. या दिवशी ‘षष्ठीदेवी स्तोत्र’ वाचतात.

२ ई. कुंभायन : १९.१.२०२१ या दिवशी उत्तररात्री २.३२ मि. नंतर रवि ग्रह सायन पद्धतीनुसार (पाश्चात्त्य पद्धतीनुसार) कुंभ राशीत प्रवेश करत आहे.

२ उ. गुरु पश्चिम लोप (अस्त) : गुरु ग्रह १९.१.२०२१ या दिवशी सूर्य सान्निध्यामुळे अस्तंगत होत आहे. १९.१.२०२१ पासून ११.२.२०२१ पर्यंत गुरु ग्रहाचा अस्त आहे. गुरु ग्रहाचा अस्तंगत कालावधी मंगलकार्यासाठी आणि धार्मिक कृत्यांसाठी वर्ज्य करतात.

२ ऊ. बुधाष्टमी : बुधवारी येणार्‍या अष्टमी तिथीला ‘बुधाष्टमी’ म्हणतात. बौद्धिक त्रास दूर होण्यासाठी श्रद्धापूर्वक ‘बुधाष्टमी’ हे व्रत करतात. बुधाष्टमी व्रत हे विजय प्राप्त करून देणारे आहे. या दिवशी श्रीविष्णु, श्री गणेश, भगवान शिव आणि माता पार्वती यांचे पूजन करतात. या व्रताने विपदा (संकट) टळते आणि जीवनात सकारात्मकता अन् सफलता प्राप्त होते.

२ ए. शाकंभरीदेवी उत्सवारंभ : पौष शुक्ल अष्टमी तिथीपासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरीदेवीचा उत्सव साजरा केला जातो. प्राचीन काळी दुष्काळ पडल्यावर ऋषिमुनींनी देवीची आराधना केली. त्यामुळे पर्जन्यवृष्टी झाली आणि प्रथम शाक म्हणजे पालेभाज्या उगवल्या. लोकांनी त्या पालेभाज्यांचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद म्हणून घेतला. दुष्काळ संपला, या प्रसंगाची आठवण म्हणून अजूनही हा कुळधर्म पाळला जातो. शक्य त्या भाज्यांचा नैवेद्य देवीला समर्पण करतात; म्हणून या देवीला ‘शाकंभरीदेवी’ म्हणतात.

२ ऐ. अमृत योग : अमृत योगावर कोणतेही शुभ कार्य केल्यावर यश प्राप्त होते. २३.१.२०२१ या दिवशी हा योग रात्री ९.३३ पासून २५.१.२०२१ या दिवशी उत्तररात्री १.५५ पर्यंत आहे.

टीप १ – भद्रा (विष्टी करण), घबाड मुहूर्त आणि दुर्गाष्टमी यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (९.१.२०२१)

तिथी, नक्षत्र यांचे वाचन अथवा श्रवण केल्याने होणारे लाभ

‘अधिक आश्विन मासापासून सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रत्येक रविवारी प्रसिद्ध केले जाते. आपल्या धर्मग्रंथात पंचांग श्रवणाचे महत्त्व अनन्यसाधारण सांगितले आहे. पुढील श्लोकाद्वारे या पंचांगश्रवणाचे जे फळ सांगितले आहे, ते स्पष्ट होते.

तिथेश्च श्रीकरं प्रोक्तं वारादायुष्यवर्धनम् ।
नक्षत्राद्धरते पापं योगाद्रोगनिवारणम् ।।
करणाच्चिन्तितं कार्यं पञ्चाङ्गफलमुत्तमम् ।
एतेषां श्रवणान्नित्यं गङ्गास्नानफलं लभेत् ।।

अर्थ : तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते, वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते, नक्षत्राच्या श्रवणाने पापनाश होतो, योगाच्या श्रवणाने रोग जातो, करणाच्या श्रवणाने चिंतीलेले कार्य साधते. असे हे पंचांगश्रवणाचे उत्तम फळ आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगास्नानाचे फळ मिळते.’

– सौ. प्राजक्ता जोशी (८. ११. २०२०)