आंध्रप्रदेशामधील मंदिरांवरील आक्रमणाच्या प्रकरणी भाजप आणि तेलुगु देसम् यांच्या १५ कार्यकर्त्यांना अटक

हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणासाठी हिंदूंनाच आरोपी ठरवणारे ख्रिस्ती मुख्यमंत्री असणार्‍या आंध्राचे पोलीस ! या घटनांची आता सीबीआय चौकशी करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे !

हिंदूंनाच आरोपी ठरवणारे ख्रिस्ती मुख्यमंत्री असणार्‍या आंध्राचे पोलीस !

अमरावती (आंध्रप्रदेश) – आंध्रप्रदेशात गेल्या दीड वर्षांपासून हिंदूंच्या मंदिरांवर होणारी आक्रमणे आणि मूर्तींची तोडफोड यांच्या प्रकरणात भाजप अन् तेलुगु देसम् पक्ष यांचे २० हून अधिक कार्यकर्ते सहभागी आहेत. यांपैकी १५ जणांना अटक करण्यात आली आहे, तर अन्य पसार आहेत. हे कार्यकर्ते मंदिरांवरील कथित तोडफोडीच्या घटनांविषयी अफवा पसरवत होते, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक सवांग यांनी केला आहे. यावर दोन्ही पक्षांनी टीका करत ‘पोलीस महासंचालक सरकारचे प्रवक्ते असल्याप्रमाणे वागत आहेत’, अशी टीका केली आहे.

राज्यातील भाजपचे सरचिटणीस एस्. विष्णुवर्धन रेड्डी यांनी आरोप केला आहे की, पोलीस महासंचालक लोकांची दिशाभूल करत असून ते पोलिसांच्या निष्क्रीयतेवर पांघरून घालण्याचा प्रयत्न करत आहेत. हे एक राजकीय नाटक आहे. यापूर्वी १३ जानेवारीला पोलीस महासंचालकांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, ‘मंदिरांवरील आक्रमणाच्या मागे चोरी करणारे, अंधश्रद्धा ठेवणारे आणि मद्यपान करणारे आहेत.’ सवांग यांनी यामागे कुठेही  राजकीय वाद असल्याचे म्हटलेले नव्हते, दुसरीकडे मुख्यमंत्री रेड्डी यांनी मात्र ‘विकासामध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी रचण्यात आलेले हे एक राजकीय षड्यंत्र आहे’, असे म्हटले होते.