आज पणजी येथे ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

कन्नड चित्रपट निर्माते सुदीप संजीव आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते होणार उद्घाटन

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पणजी, १५ जानेवारी (वार्ता.) – राजधानी पणजी येथे १६ जानेवारीपासून चालू होणार्‍या ५१ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (‘आंचिम’चे) कन्नड चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि गायक सुदीप संजीव आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्घाटन केले जाणार आहे. बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानात हा सोहळा होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘ऑस्कर’ विजेते इटालीयन सिनेमेटोग्राफर व्हिटोरियो स्योरारो यांना ५१ व्या ‘आंचिम’मध्ये जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ‘आंचिम’ ‘हायब्रीड’ पद्धतीने होणार आहे. यानुसार ‘आयनॉक्स’, ‘मॅकॅनिझ पॅलेस’ आणि कला अकादमी यांच्यासह ‘ऑनलाईन’ पद्धतीने चित्रपद प्रदर्शित केले जाणार आहेत. उद्घाटन समारंभाला सुमारे ९२० प्रेक्षक उपस्थित असतील. ५१ व्या ‘आंचिम’चे बांगलादेशावर मुख्य लक्ष असेल, तसेच जगातील ६० देश महोत्सवात सहभागी होणार आहेत. महोत्सवात ११९ चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत आणि यांमधील ८५ चित्रपट हे ‘प्रिमिअर’ आहेत. डॅनिश चित्रपट निर्माते थॉमस व्हिंटरबर्ग यांचा ‘अनादर राऊंड’ यांच्या चित्रपटाने महोत्सवाला प्रारंभ होणार आहे, तर जपानचा ऐतिहासिक ड्रामा ‘वायफ ऑफ स्पाय’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होणार आहे.