गोव्याला कोरोना लसीचे २३ सहस्र ५०० ‘शॉट्स’ मिळाले ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी –  गोवा राज्याला १३ जानेवारी या दिवशी सकाळी कोरोना लसीचे २ सहस्र ३५० ‘वायल’चे प्रत्येक १० ‘डोस’ म्हणजेच २३ सहस्र ५०० ‘शॉट्स’ मिळाले आहेत. संबंधित यंत्रणेकडून लस सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहे आणि लसीकरणाच्या २४ घंटे अगोदर लसीचे ‘शॉट्स’ संबंधित केंद्रामध्ये पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

गोव्यात कोरोनाच्या लसीकरणाला १६ जानेवारी या दिवशी सकाळी ८ वाजता प्रारंभ होणार आहे. आरोग्य खात्याशी निगडित कर्मचार्‍यांना प्रथम लसीकरणाचा लाभ होणार आहे.

कोरोनासंबंधीच्या सामूहिक लसीकरण कार्यक्रमात ‘आय.एम्.ए.’ सक्रीय सहभाग घेणार

कोरोनासंबंधीच्या सामूहिक लसीकरण कार्यक्रमात ‘इंडियन मेडिकल आसोसिएशन’चा (आय.एम्.ए.) गोवा विभाग सक्रीय सहभाग घेणार आहे. ‘आय.एम्.ए.’चे सर्व कार्यकर्ते सामूहिक लसीकरण कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात आणि ‘आय.एम्.ए.’च्या सर्व साधनसुविधा या कार्यक्रमासाठी वापरल्या जाऊ शकतात. कोरोनासंबंधीच्या सामूहिक लसीकरण कार्यक्रमाचे पूर्वनियोजन आणि प्रत्यक्ष कार्यवाही यांमध्ये ‘आय.एम्.ए.’च्या गोवा विभागातील सदस्यांनी सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन ‘आय.एम्.ए.’ने केले आहे.