वर्ष २००८ च्या मुंबईवरील आक्रमणाचा सूत्रधार जकी उर रहमान लखवी याला १५ वर्षांची शिक्षा

‘एफ्.ए.टी.एफ्.’च्या (जागतिक स्तरावर आतंकवाद्यांना पैसे पुरवणार्‍यांवर कारवाई करणार्‍या संस्थेच्या) काळ्या सूचीत जाण्यापासून वाचण्यासाठी पाकिस्तान अशा प्रकारच्या शिक्षा ठोठावत असल्याचे दाखवत आहे; प्रत्यक्षात हे आतंकवादी मोकाटच फिरतात आणि त्यांच्या कारवाया चालू असतात, असे यापूर्वी आतंकवादी हाफिज सईद याच्या उदाहरणातून उघड झाले आहे !

जकी उर रहमान लखवी

लाहोर (पाकिस्तान) – येथील आतंकवादविरोधी न्यायालयाने लष्कर-ए-तोयबाचा कमांडर आणि मुंबईवरील वर्ष २००८ च्या आतंकवादी आक्रमणाचा सूत्रधार आतंकवादी जकी उर रहमान लखवी याला आतंकवादी कारवायांसाठी अर्थपुरवठा केल्याच्या एका प्रकरणात १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

चिकित्सालय चालवण्याच्या नावाखाली तो पैसे गोळा करत होता आणि त्या पैशांचा वापर आतंकवादी कृत्यांसाठी करत होता, असा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला. हा पैसा आतंकवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी वापरण्यात येत होता.