राहुल गांधी विदेश दौर्‍यावर असल्याने गोव्यातील काँग्रेसच्या नेत्याची निवड लांबणीवर

पणजी, ५ जानेवारी (वार्ता.) – राहुल गांधी विदेश दौर्‍यावर असल्याने गोव्यातील काँग्रेसच्या नेत्याची निवड लांबणीवर पडली आहे. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पदाचे त्यागपत्र दिले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत सध्या देहली दौर्‍यावर आहेत. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले, ‘‘देहली दौर्‍यात गोव्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या कामगिरीला अनुसरून बैठकांचे सत्र चालू आहे.’’ अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव तथा गोवा प्रभारी दिनेश गुंड्डू राव हे नुकतेच गोवा भेटीवर आले होते. प्राप्त माहितीनुसार पक्षाचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी सध्या विदेश दौर्‍यावर असल्याने आणि नेतृत्वाचा निर्णय ते देशात परतल्यानंतरच घेतला जाणार असल्याने गोव्यातील काँग्रेसला राहुल गांधी परतण्याची वाट पहावी लागणार आहे.