‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चा समर्थक लिस्टर आल्फोन्सोच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट

‘गोवा वेगळे राष्ट्र बनवता येते का ?’, अशी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केल्याचे प्रकरण

  • अशा फुटीरतावाद्यांच्या संघटनेवर बंदी का घालू नये ?
  • या संघटनेमागे आंतरराष्ट्रीय शक्ती कोणती आहे, याचे अन्वेषण व्हावे !

 

म्हापसा, १ जानेवारी (वार्ता.) – ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स सपोर्टर’ या नावाच्या ‘फेसबूक पेज’वर ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चे (‘आर्.जी.’चे) समर्थक तथा म्हापसा येथील नागरिक लेस्टर आल्फोन्सो याने ‘गोवा भारतापासून तोडून गोव्याचे वेगळे राष्ट्र बनवता येते का ?’, अशी लोकांना प्रश्‍न विचारणारी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित केली होती. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने लेस्टर आल्फोन्सो याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा प्रविष्ट केला, तसेच या प्रकरणी ‘आर्.जी.’च्या सदस्यांचे अन्वेषण चालू केले आहे.

गुन्हे अन्वेषण विभागाने दिलेल्या माहितीनुसार ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स’चा समर्थक लेस्टर आल्फोन्सो याने पुढील चिथावणीखोर आणि मानहानीकारक ‘पोस्ट’ प्रसारित केली आहे. ‘गोवा भारतापासून निराळे करून ते एक निराळे राज्य होऊ शकते का ? हा एक विचार आहे. होय तर ‘आर्.जी.’ला गोव्याचे पूर्ण शासकीय अधिकार द्यावेत. प्रमोदला (मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना संबोधून) सावंतवाडीला जाऊ दे किंवा त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये जाऊ दे. प्रमोद हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक क्रियाशील सदस्य आहे.’’ (यातून ‘आर्.जी.’चा समर्थक लेस्टर आल्फोन्सो याचा संघद्वेष; म्हणजेच हिंदुद्वेषही उघड होतो ! – संपादक)

गुन्हे अन्वेषण विभागाच्या मते लेस्टर आल्फोन्सो याने ही ‘पोस्ट’ प्रसारित करून राज्यातील शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. या ‘पोस्ट’द्वारे लोकांमध्ये द्वेषभावना निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे. गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणी ‘आर्.जी.’चे अध्यक्ष वीरेश बोरकर यांचे अन्वेषण केले आहे. या प्रकरणी ‘आर्.जी.’च्या अन्य सदस्यांनाही पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे अन्वेषण केले जाणार असल्याचे गुन्हे अन्वेेषण विभागाचे म्हणणे आहे.