वटवृक्ष स्वामी मंदिरात श्रीदत्त जन्मोत्सव भक्तिभावाने साजरा

कोरोनामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा रहित

श्री दत्त जन्म सोहळा आणि पाळणा पूजन प्रसंगी देवस्थानचे पुरोहित मंदार महाराज पुजारी आणि अध्यक्ष महेश इंगळे

अक्कलकोट – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळस्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात २९ डिसेंबरला दत्त जयंतीनिमित्त श्री दत्त जन्मोत्सव भक्तीभावाने आणि अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला. २९ डिसेंबरला ५ वाजता मंगलमय वातावरणात देवस्थानचे पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते आणि मंदिर समितीचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अन् विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांच्या उपस्थितीत श्रींची काकडआरती करण्यात आली. सकाळी १०.३० वाजता देवस्थानात श्रींचा नैवेद्य आरती सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला.

दुपारी ४ ते सायं. ५.३० या वेळेत देवस्थानच्या विश्वस्त सौ. उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली श्री दत्त जन्म आख्यान झाले. यानंतर दत्त नामजप आणि सायंकाळी ६ वाजता पुरोहित मोहन पुजारी आणि मंदार महाराज यांच्या हस्ते पाळणा पूजन, श्री दत्त जन्मोत्सव, आरती होऊन श्री दत्त जन्म सोहळा श्रींच्या गाभारा मंडपात पार पडला. या वेळी अक्कलकोट शहरातून निघणारा पालखी सोहळा आणि इतर धार्मिक कार्यक्रम रहित करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली. या वेळी देवस्थानचे चिटणीस श्री. आत्माराम घाटगे, विश्वस्त श्री. महेश गोगी, श्री. संजय पवार, श्री. स्वामीनाथ लोणारी, श्री. गिरीश पवार, श्री. श्रीशैल गवंडी, श्री. विपूल जाधव, श्री. अविनाश क्षीरसागर आदी उपस्थित होते.