बी.आर्.टी. मार्गावरील खासगी वाहनचालकांकडून ३ कोटी रुपयांची दंड वसुली !

११ महिन्यांत ३९ सहस्र ५०७ वाहनांवर कारवाई

पिंपरी (पुणे) – शहरातील ११ महिन्यांत बी.आर्.टी. मार्गामध्ये (बस रॅपिड ट्रान्सिट रूट – बस वेगाने जाण्याचा मार्ग) खासगी गाड्या चालवणार्‍या ३९ सहस्र ५०७ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ३ कोटी ७१ लाख ७८ सहस्र रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. शहरातील सार्वजनिक वाहतूक जलद करण्यासाठी बी.आर्.टी. मार्गांची आखणी करण्यात आली होती. वाहतूक कोंडीच्या वेळी हा बी.आर्.टी. मार्ग रिकामी असल्याने अनेक वाहनचालक त्या मार्गांमध्ये गाडी नेतात. मार्ग रिकामी असल्याने भरधाव वेगाने गाडी चालवतांना अनेक अपघातही घडले असल्याचे दिसून येते. गेल्या २ वर्षांपासून ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’ने या मार्गांवरील ‘वॉर्डन’ हटवले आहेत. त्यामुळे या मार्गांमध्ये घुसखोरी करणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे.

बी.आर्.टी. मार्गामध्ये गाडी नेल्यास वाहनचालकांकडून ‘नो एण्ट्री’साठीचा (प्रवेश निषिद्धसाठी) ५०० रुपये दंड वसूल करण्यात येतो. याशिवाय वाहन परवाना नसणे, भ्रमणभाषवर बोलणे, ‘सीट बेल्ट’ न लावणे, कागदपत्रे न बाळगणे आणि जुनी दंड वसुलीही या वेळी केली जाते. आगामी काळातही या मार्गांवरील कारवाई चालू राहील, अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिली.