‘मी वर्ष २०२१ पासून साधना चालू केली आणि गुरुकृपेने वर्ष २०२२ पासून मी पूर्णवेळ साधना करू लागले. मी साधनेत येण्यापूर्वीपासून आतापर्यंत अनुभवलेली गुरुकृपा कृतज्ञतापूर्वक गुरुचरणी अर्पण करते. २८ डिसेंबर या दिवशी या लेखातील काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/867683.html
४. पूर्णवेळ साधना करण्यास नातेवाइकांचा विरोध होणे; मात्र गुरुचरणी जाण्यासाठी गुरूंवर भार सोपवणे
माझे नातेवाईक मला सांगत असत, ‘गुरुदेवांनी तुला बोलावले आहे का ? मग तू साधनेत पूर्णवेळ होण्याचा निर्णय का घेतेस ? आधी आर्थिकदृष्ट्या सक्षम हो. मग काय करायचे ?, ते तू पाहू शकतेस.’ यामुळे ‘मी संस्थेला भार होईन का ?’, असे विचार माझ्या मनात येऊ लागले. ‘ही माझ्या श्रद्धेची परीक्षा आहे’, असे मला वाटले. मी द्विधा स्थितीत होते. मला अंतर्मनात ‘पूर्णवेळ साधना करण्यात जो आनंद आहे, तो कोणत्याच पदवीत किंवा पदामध्ये नाही’, याची जाणीव होती; परंतु ‘माझ्याजवळ काहीही आर्थिक साठा केलेला नसतांना हा निर्णय घेणे योग्य आहे का ?’, असे मला वाटत होते. तेव्हा भक्तीसत्संगात शिकवलेली सूत्रे मला आठवू लागली. त्यातून मला दृष्टीकोन मिळाला, ‘गुरूंवर सर्व सोडल्यावर ते आपली सर्वतोपरी काळजी घेतात. पैसे आणि नातेवाईक यांना मर्यादा आहेत; परंतु गुरूंमुळे आपला उद्धारच होणार आहे.’ याविषयी मला ‘मी मार्गदर्शन घ्यायला हवे’, असे वाटू लागले. त्यासाठी मी गुरुदेवांचा सतत धावा करू लागले आणि ‘मला लवकर तुमच्या चरणी घ्या’, अशी प्रार्थना होऊ लागली.
५. संतांनी आश्वस्त केल्याने द्वंद्व संपून पूर्णवेळ साधना करण्याचा निश्चय करणे
६.८.२०२२ या दिवशी एका शिबिरात मला संतांना भेटण्याची संधी मिळाली. आत्मनिवेदन केल्यावर त्यांनी मार्गदर्शन करतांना म्हटले, ‘‘संस्थेवर भार कशी होशील ? देव काळजी घेतो ना ?’’ त्यांच्या या एका वाक्याने माझ्या मनातील विचारांचे युद्ध संपल्याचे जाणवले. माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि मी गुरुकृपेने पूर्ण वेळ साधक होण्याचा निश्चय केला.
६. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूललनाच्या प्रक्रियेतून ‘साधनेच्या दृष्टीने कसे वागावे ?’, हे शिकता येणे
मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूललनाची प्रक्रिया करत असतांना माझ्या मनात अनेक नकारात्मक विचार यायचे अन् माझा संघर्ष व्हायचा; पण माझ्या मनाची स्थिती लगेच पालटायची. तेव्हा अनेक प्रसंग झाले. त्यांतून मी शिकत होते. देहबुद्धी विसरून पूर्णपणे सेवेत रमायचे आणि मनाविरुद्ध वागतांना स्थिर रहायचे, हे मला जमू लागले. ‘लहानसहान गोष्टींतही साधनेच्या दृष्टीने कसे वागावे ?’, हे मला त्यातून कळले.
७. आध्यात्मिक स्तरावरील त्रासांविषयी संतांशी बोलल्यावर त्यांनी आश्वस्त करणे, तसेच व्यष्टी साधनेच्या आढावा सेविकेनेही साहाय्य करणे
मला काही दिवसांनी वेगवेगळे त्रास जाणवू लागले. त्यांविषयी उत्तरदायी साधकांना विचारल्यावर ‘माझ्या आध्यात्मिक स्तरावरील त्रासांची तीव्रता वाढली आहे’, असे मला समजले. यामुळे अनेक विचार माझ्या मनात येऊ लागले. काही दिवसांनी साधना सोडण्याचेही विचार माझ्या मनात येऊ लागले. ‘या विचारांशी कसे लढायचे ?’, हे मला समजेना. तेवढ्यात माझी एका संतांशी भेट झाली. त्यांनी मला ‘‘ तुझे सर्व चांगले होईल’’, असे सांगितले. तेव्हा मला लक्षात आले, ‘मला माझ्या विचारांशी लढावेच लागेल.’ त्यामुळे मी माझ्या व्यष्टी साधनेच्या आढावा सेविका सौ. सुप्रिया माथुर यांना मनाची स्थिती लिहून दिली. त्यांनी मला पुष्कळ साहाय्य केले.
८. त्रासांची तीव्रता असूनही सहसाधक आणि संत यांच्या साहाय्यामुळे त्रास लवकर न्यून होणे
या कालावधीत सहसाधक आणि पू. रेखाताई (सनातन संस्थेच्या ६० व्या (समष्टी) संत पू. रेखा काणकोणकर [वय ४७ वर्षे]) यांची अमूल्य प्रीती मला अनुभवायला मिळाली. सर्वजण मला समजून घेत आणि मला ‘त्रासांशी लढण्यासाठी कसे प्रयत्न करू शकतो ?’, हे वेळोवेळी सुचवत. ‘मला त्रास होत आहे’, हे लक्षात येताच ‘त्रासदायक शक्तीचे आवरण काढ, भावजागृतीचे प्रयत्न कर, क्षमायाचना कर, विचार लिहून काढ, संतांशी बोल’, असे गुरुदेवच सर्वांच्या माध्यमातून आठवण करून देत असत. त्याप्रमाणे मी करत रहायचे आणि शरण जाऊन प्रार्थना करायचे. मग एकदा मला पू. ताईंनी सांगितले, ‘तू कानात ‘ईअरफोन’ लावून प.पू. भक्तराज महाराज यांची भजने आणि नामजप ऐकत जा.’ तसे केल्याने मला आवरण लवकर न्यून होत असल्याचे जाणवले. त्यांनी मला नामजप लिहून काढण्यास सांगितला. मी तसेही प्रयत्न केले आणि माझे त्रास न्यून होत गेले.
९. ध्यानमंदिरात नामजपादी उपाय केल्यावर गुरुकृपेने आध्यात्मिक त्रास न्यून होणे
मी ध्यानमंदिरात नामजपादी उपाय करतांना गुरुपरंपरेला शरण जाऊन प्रार्थना करायचे. तेव्हा मला ‘केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र तारक वाटायचे आणि अन्य गुरूंचे स्वरूप मारक आहे’, असे वाटायचे. हळूहळू एक एक छायाचित्र तारक होत गेल्याचे मला काही दिवसांनी जाणवू लागले. एके दिवशी केवळ प.पू. रामानंद महाराज यांचे स्वरूप मला मारक वाटत होते. मी २ घंटे नामजपादी उपाय केल्यावर ‘त्यांचे छायाचित्रही वात्सल्यपूर्ण झाले आहे’, असे मला जाणवले. त्यानंतर २ दिवसांनी मला समजले, ‘माझा त्रास आता मध्यम झाला आहे.’ यामुळे ‘गुरुतत्त्वानेच मला तीव्र त्रासातून मुक्त केले आहे’, हे माझ्या लक्षात आले.
१०. कृतज्ञता आणि प्रार्थना
आता मी आश्रमात सेवा करते. ‘देवाने मला हात धरून इथपर्यंत आणले आहे आणि तो मला पुढे पुढे नेत आहे’, हे अनुभवतांना मला पुष्कळ कृतज्ञता वाटते. या जिवाला देवाने त्याच्या चरणांची सेवा देऊन कृतार्थ केले आहे. यातून ‘देव किती करुणामय आहे !’, हे लक्षात येते. माझे जीवन योग्य दिशेला वळवल्यामुळे मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे. ‘मला गुरुचरणांजवळ असेच पुढे पुढे घेऊन जावे’, अशी मी देवाला प्रार्थना करते.’
(समाप्त)
– एक साधिका, फोंडा, गोवा. (१४.२.२०२४)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |