हिंदूंच्या सणांमुळे प्रदूषण होत असल्याची ओरड करणारे सांडपाणी नदीत सोडले जाण्याविषयी चकार शब्द काढत नाहीत !
पुणे – सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया न करता ते नदीत सोडल्यामुळे जलप्रदूषण होऊन माशांचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवत ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने पुणे महानगरपालिकेला नोटीस बजावली असून १५ दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या दीर्घकालीन उपाययोजनांचा आराखडा सादर करण्याची सूचनाही महापालिकेला केली आहे. महापालिकेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मंडळाची संमती न घेता चालू असल्याचे निदर्शनास आले. महानगरपालिकेने १५ दिवसांत अहवाल सादर न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यात म्हटले आहे.
पुणे महानगरपालिकेकडून प्रतिदिन ९० एम्.एल्.डी. (९० दशलक्ष लिटर प्रतिदिन) सांडपाणी प्रक्रिया न करता मुळा आणि मुठा नद्यांत सोडले जाते. नवीन सांडपाणी प्रकल्पाचे काम अपूर्ण असतांना जुना ‘नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प’ पाडण्यात आला आहे. महापालिकेचे शहरात विविध ठिकाणी ५६७ एम्.एल्.डी. क्षमतेचे सांडपाणी प्रकल्प आहेत. या प्रकल्पाच्या संमतीची मुदत ३१ डिसेंबर २०२३ या दिवशी संपली आहे. (अनुमती न घेता १ वर्ष सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कुणाच्या अनुमतीने चालू आहेत, याची चौकशी होणे आवश्यक ! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची अनुमती नाही, हे लक्षात येण्यासाठी १ वर्ष लागले, यातून महामंडळातील कर्मचार्यांचा कामचुकारपणा लक्षात येतो. – संपादक)
महापालिकेचा नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि नदी परिसराची मंडळाच्या अन् महापालिकेच्या अधिकार्यांनी संयुक्त पहाणी केली. त्या वेळी त्यांना नदी काठावर मासे मृत अवस्थेत आढळून आले. याचसमवेत ‘नदी सुधार योजने’ची कार्यवाही चालू असलेल्या ठिकाणी पाणी वहात नसल्याचे, तसेच नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाशेजारील ३ नाल्यांतून येणारे सांडपाणी नदीत मिसळत असल्याचे निदर्शनास आले. नाल्यातील पाणी गढूळ, काळ्या रंगाचे, दुर्गंधीयुक्त असून त्याचे पी.एच्. मूल्य (पाण्यातील आम्लता आणि क्षार मोजण्याचे प्रमाण) ६-७ आहे.