कणकवली – सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने २९ डिसेंबरला शहरातील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान येथे वारकरी मेळावा आणि ‘संतसेवा पुरस्कार’ वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी मान्यवरांच्या हस्ते ह.भ.प. रमाकांत गायकवाड आणि ह.भ.प. तायाराम गुरव यांना ‘संतसेवा पुरस्कार’ प्रदान करून गौरवण्यात आले.
या मेळाव्याच्या निमित्ताने प्रारंभी शहरातील परमहंस भालचंद्र महाराज संस्थान ते बाजारपेठमार्गे कार्यस्थळापर्यंत टाळ मृदंगासह हरिपाठ आणि हरिनाम यांच्या गजरात दिंडी काढण्यात आली होती.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे) अध्यक्ष मनीष दळवी, माजी आमदार वैभव नाईक, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर, कार्याध्यक्ष ह.भ.प. रामचंद्र कदम आदींसह मोठ्या संख्येने वारकरी या सोहळ्याला उपस्थित होते.
या वेळी मनीष दळवी म्हणाले, ‘‘या संप्रदायाची वर्षानुवर्षे चालू असलेली वारीची परंपरा विठ्ठल चरणी असलेली श्रद्धा आणि भक्ती, सर्वांप्रती असलेले प्रेम, जिव्हाळा, नि:स्वार्थ सेवेवरील निष्ठा यांमुळेच पुढे गेली आहे. हिंदु धर्माची विचारधारा प्रत्येक हिंदूच्या मनात रुजवण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले आहे.’’
मानवी मनातील अवगुण घालवण्याचे काम वारकरी करतो.
साधू-संतांची शिकवण तरुणपिढीला देण्याचे कार्य वारकरी संप्रदाय करत आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी काढले.
‘वारकरी’ हा शब्द ऐकल्यावर आपल्या मनामध्ये एक भाव निर्माण होऊन विठुरायाची प्रतिकृती आपल्यासमोर उभी रहाते, याची प्रचीती मला या कार्यक्रमात आली. वारकरी संप्रदाय हा त्याग आणि प्रेम या २ गोष्टींवर उभा आहे, असे तहसीलदार तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी वेळी सांगितले.