सिंधुदुर्ग – येत्या २६ जानेवारी २०२१ या दिवशी वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथे उभारण्यात आलेल्या विमानतळाचे उद्घाटन होणार असल्याचे म्हटले जात आहे. याविषयी केंद्रस्तरावरून, तसेच स्थानिक नेतेही सांगत आहे. या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर या विमानतळाच्या नामकरणावरून नवा वाद चालू झाला आहे. ‘विमानतळाला कुणाचे नाव द्यावे ?’, यावरून आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रथम विमानतळ चालू करा, मग नाव द्या’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
चिपी विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या ! – आमदार नितेश राणे, भाजप
‘चिपी विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे’, अशी मागणी भाजपचे नेते तथा आमदार नितेश राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. खासदार नारायण राणे बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक होते. चिपी विमानतळ हा नारायण राणे यांचा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ (स्वप्नातील प्रकल्प) आहे. त्यामुळे याविषयी योग्य विचार करण्यात यावा, असे आमदार राणे यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे, तसेच ‘या विमानतळाला बाळासाहेबांचे नाव द्यावे, हे माझे वैयक्तिक मत आहे’, असेही त्यांनी म्हटले आहे.
आमदार नितेश राणे यांच्या ट्वीटचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी स्वागत केले आहे. मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी ‘कधीही बंद पडू शकणार्या या विमानतळाला बाळासाहेबांचे नाव न देता मुंबई-गोवा महामार्गाला त्यांचे नाव द्यावे’, अशी मागणी केली आहे.
विमानतळाचा नाव देण्याचा अधिकार राज्याला असल्याचे केंद्राचे मत
केंद्राने राज्याला नाव देण्याचा अधिकार असल्याचे सांगितले आहे. विमानतळ लवकर चालू करण्याविषयी प्रयत्न चालू आहेत. २६ जानेवारी २०२१ या दिवशी चिपी विमानतळ चालू करण्याविषयी संबंधितांनी सांगितले आहे. ‘अनुज्ञप्ती (लायसन्स) मिळाली की, लवकरच विमानतळ चालू करू. हे विमानतळ अत्याधुनिक पद्धतीने बनवले असल्याने त्याचा मोठा उपयोग होणार आहे’, असे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.
गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही ! – आमदार वैभव नाईक, शिवसेना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग दौर्यावर आले होते, त्याच वेळी चिपी विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली. चिपी विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव दिले जाणार आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी चिपी विमानतळाच्या नामकरणाची चिंता करू नये. ज्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला, अशा गद्दारांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा मुळीच अधिकार नाही, अशी खरमरीत टीका शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आमदार नितेश राणे यांच्या ट्वीटवर केली.
विमानतळासाठीच्या भूसंपादनात घोळ घालणार्यांनी श्रेय घेऊ नये ! – आमदार दीपक केसरकर, शिवसेना
चिपी विमानतळ हा नारायण राणे यांचा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ असला, तरी राणे यांना त्यांच्या मंत्रीपदाच्या कारकीर्दीत या विमानतळाच्या विकासाचा एक साधा दगडही लावता आला नाही. विमानतळाचे भूमीसंपादन त्यांच्या काळात झाले; परंतु या भूसंपादनात अतिरिक्त भूसंपादनाचा घोळ घालून ठेवला होता. या विमानतळासाठी शिवसेनेने खूप प्रयत्न केले असल्याने हा प्रकल्प आता पूर्ण झाला आहे आणि त्याचे फुकाचे श्रेय राणे कुटुंबीय घेऊ पहात आहे. तसेच गद्दारांना बाळासाहेबांचे नावदेखील घेण्याचा काहीच अधिकार नाही, अशी टीका माजी पालकमंत्री तथा शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे.