वर्ष २००५ मध्ये अमेरिकेत जॉर्ज बुश राष्ट्राध्यक्ष असतांना गोध्रा दंगल प्रकरणावरून तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा नाकारण्यात आला होता. त्यांच्या विरोधात द्वेषाचे वातावरण निर्माण करण्यात आले होते. पुढे गुजरातला विकासाचे ‘मॉडेल’ बनवले आणि नंतर ते भारताचे लोकप्रिय पंतप्रधान झाल्याने स्थिती पूर्णतः पालटली.
हिंदूंच्या बहुमताने मोदी भारताचे पंतप्रधान झाल्याने त्यापुढे अमेरिकेलाही मान तुकवावी लागली. एकेकाळी बंदी घातलेल्या भारताच्या या नेत्याला अमेरिका स्वतःहून निमंत्रण देऊ लागली आणि आता तर वर्ष २०२० संपतांना त्यांना रणनैतिक भागिदारीत त्यांचे नेतृत्व अन् क्षमता यांसाठी आणि वैश्विक शांती अन् समृद्धी वाढवण्याच्या योगदानासाठी अमेरिकेचा प्रतिष्ठित ‘लिजन ऑफ मेरिट’ पुरस्कार देऊन अमेरिकेने गौरवले. मोदी यांनी पंतप्रधान झाल्यावर विविध देशांचे दौरे करून आंतरराष्ट्रीय संबंध सुधारून त्याचा लाभ भारतासाठी करून घ्यायला आरंभ केला. त्यानंतर मोदी यांचे अमेरिकेचे दौरे चालू राहिले. वर्ष २०१४ नंतर ते अमेरिकेत ६ वेळा जाऊन आले.
मोदी यांची आंतरराष्ट्रीय नीती !
डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यावर भारत-अमेरिका संबंध दृढ होण्यात मोदी यांची परराष्ट्रनीतीही कारणीभूत ठरली. प्रत्येक दौर्यात हे संबंध अधिकाधिक घट्ट झाले. त्यामुळे एखाद्या देशात एकेकाळी बंदी घातलेल्या व्यक्तीला त्याच देशाच्या सर्वोच्च सन्मानाने गौरवले जाणे, हा मोदी यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे. या दौर्यांतून मोदी यांनी भारताच्या आर्थिक, तांत्रिक आणि सुरक्षा अशा सर्वच क्षेत्रांत भारताला अनुकूल असे वातावरण विविध करार अन् चर्चा यांच्या माध्यमातून निर्माण केले. मोदी यांनी आंतरराष्ट्रीय संबंधांतून अशी स्थिती निर्माण केली की, मागील वर्षी पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले, ‘‘तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन काहीही सांगा, आज सर्व जण भारतावरच विश्वास ठेवत आहे.’’ ३७० कलम, एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक सर्वच प्रकरणांत विश्वातील देश भारताच्या बाजूने ठामपणे उभे राहिले, हा मोदी यांच्या नीतीचाही परिणाम आहे.
वर्ष २०१८ मध्ये फोर्ब्स नियतकालिकात ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी मोदी यांचे मार्गदर्शन घेण्याचा सल्ला दिला गेला, हीसुद्धा एक अधोरेखित करण्यासारखी गोष्ट होती. वर्ष २०१९ मध्ये ५० सहस्रांहून अधिक भारतियांसमोर ‘हाऊडी मोदी’ म्हणून अमेरिकेने केलेले मोदी यांचे स्वागत ऐतिहासिक ठरले. ह्युस्टनमध्ये भारत आणि अमेरिका यांच्या प्रमुखांनी एका व्यासपिठावर येणे याकडे संपूर्ण जगाचे लक्ष राहिले होते. त्या वेळी अमेरिकेने त्यांचे स्वागत करतांना म्हटले, ‘‘दोन्ही देशांतील लोकांचे संबंध बळकट होत आहेत. भारतीय लोक असाधारण आहेत. त्यांनी अमेरिकेसाठी मोठे योगदान दिले आहे. भारत आणि अमेरिका यांचे संबंध दिवसेंदिवस दृढ होत आहेत. भारत केवळ बलशाली राष्ट्र नाही, तर विश्वास ठेवावा असा मित्र आहे. भारतीय नागरिक अमेरिकेत पालट करत आहेत. संशोधन, सरकार आणि सेना या तिन्ही क्षेत्रांत ते असून त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली. त्यांनी आम्हाला त्यांचे संस्कार आणि इतिहास याविषयी सांगितले आहे.’’
या ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकांपूर्वी अमेरिकेच्या राजदूत हेली यांनी म्हटले, ‘भारताशी एवढे घनिष्ठ संबंध यापूर्वी कधीही नव्हते.’ मोदी सध्या विश्वातील सर्व देशांना साहाय्य करतात, अशी त्यांची ख्याती आहे. कोरोनाकाळात केलेल्या साहाय्यामुळे ब्राझिलने नरेंद्र मोदी यांचे आभार मानले, तर भारताला आवश्यकता असूनही अमेरिकेला औषधे दिल्याने अमेरिकेनेही त्यांचे कौतुक केले. कोरोना, चीनची कुरघोडी, आर्थिक मंदी, नैसर्गिक संकटे, तेथील साम्यवाद्यांचा दबाव, आंदोलने यांमुळे गृहयुद्धासारखी स्थिती झालेल्या अमेरिकेला पहिली आठवण भारताची म्हणजे मोदी यांची झाली होती.
अमेरिकेच्या विकासात महत्त्वाचा सहभाग देणारी ३० लाखांपेक्षा अधिक भारतीय वंशाची लोकसंख्या असणे, हा भारत-अमेरिका संबंधातील महत्त्वाचा दुवा आहेच. गेल्या दोन पिढ्या भारतीय अमेरिकेत जात आहेत आणि हे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत तरी अमेरिका त्यांना दुय्यम लेखत होती; परंतु गेल्या काही वर्षांत हे चित्र पालटत आहे. भारताचा सर्वाधिक म्हणजे १५० मिलियन डॉलर एवढा व्यापार अमेरिकेशी आहे. चीन आणि आतंकवाद यांच्या विरोधात लढण्यासाठी अमेरिकेचा भारताला पाठिंबा आहे. यात अमेरिकेचा स्वार्थ नक्कीच आहे; परंतु भारताचाही लाभ आहे; कारण अमेरिका आजही महासत्ता आहे.
भारतीय संस्कृतीचा प्रभाव
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी खिशात हनुमानाचे चित्र ठेवणे, अमेरिकेच्या संसदेचा आरंभ वेदमंत्रपठणाने होणे या गोष्टी तेव्हापासूनच होत होत्या. आता अमेरिकेत हिंदु संस्कृती अंगीकारणार्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. ‘येणारा आपत्काळ आणि संभाव्य महायुद्ध यानंतर भारत एक समृद्ध राष्ट्र म्हणून उदयाला येणार आहे’, असे अनेक देश-विदेशी भविष्यवेत्त्यांनी सांगितले आहे. त्याची ही चुणूक आहे, असे कुणाला वाटले तर चूक नव्हे. वर्ष २०१४ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक नेता म्हणून प्रसिद्धी मिळू लागली. आतापर्यंत सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात (यूएई), रशिया आणि मालदीव यांनी त्यांच्या देशाच्या प्रतिष्ठित पुरस्कारांनी मोदी यांना सन्मानित केले. त्यात आता अमेरिकेची भर पडली आहे. हा काळाचा महिमा आहे. येणार्या काळात भारत विश्वात सर्वोच्च स्थानावर जाणार आहे, याची ही नांदी आहे. केवळ ख्रिस्ती नव्हे, तर साम्यवादी आणि मुसलमान राष्ट्रांना हिंदुत्वनिष्ठ पक्षाच्या पंतप्रधानांना पुरस्कार द्यावासा वाटणे, हा भारताच्या सर्वसमावेशक संस्कृतीचा परिपाक आहे. जगाला आर्य (सुसंस्कृत) बनवण्याचे ध्येय ठेवणार्या देशाच्या परंपरेला साजेसे हे होत आहे. भारताची ओळख आता केवळ ‘मोठी बाजारपेठ’ आणि ‘उभारी घेणारा विकसनशील देश’ म्हणून राहिलेली नाही, तर भोगवाद, साम्यवाद आणि हुकूमशाही यांना कंटाळून विश्वातील लोक आता सहिष्णुता आणि शांती अंगीकारत जगणार्या भारतियांकडे आशेने पहात आहेत, याचे हे प्रतीक आहे.