अन्य देशांप्रमाणे घुसखोरीच्या विरोधात कठोर शिक्षेची तरतूद करून त्याची कार्यवाही केल्यासच घुसखोरीच्या समस्येला आळा बसेल !
नगर – पारनेर तालुक्यातील सुपा ग्रामपंचायत हद्दीमध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे ९१ बांगलादेशी आणि परप्रांतीय नागरिकांची नावे समाविष्ट करण्यात आल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. ही बोगस नावे वगळण्यात यावीत, तसेच या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बोगस नावे असणार्या लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी मागणीही मनसेने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांना केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास आपल्या दालनात आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणीही मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे, पारनेर तालुकाध्यक्ष बाळासाहेब माळी यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी दिली आहे. याविषयी ग्रामविकास अधिकारी यांनीसुद्धा पहाणी करून अहवाल सादर केला होता, तरीसुद्धा ही नावे वगळण्यात आली नाहीत, असेही मनसेच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.