आतंकवादी झकीऊर रेहमान लखवी याला प्रतीमहा दीड लाख रुपये खर्चासाठी देण्यास संयुक्त राष्ट्रांची पाकला अनुमती

संयुक्त राष्ट्रांनी एकीकडे आतंकवाद निपटण्याच्या गप्पा मारायच्या आणि दुसर्‍या बाजूने अशा प्रकारे आतंकवाद्यांना सहानुभूती दाखवायची, हे संतापजनक होय. यावरून संयुक्त राष्ट्रांचा कारभार कसा चालतो आणि ते आतंकवाद निपटण्याविषयी किती संवेदनशील आहेत, हेच दिसून येते !  

आतंकवादी झकीऊर रेहमान लखवी

जिनेव्हा (स्वित्झर्लंड) – मुंबईवरील २६/११ च्या आतंकवादी आक्रमणाचा कट रचणारा आतंकवादी झकीऊर रेहमान लखवी याला प्रतीमहा दीड लाख रुपये खर्चासाठी देण्यास संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या समितीने संमती दिली आहे.

पाक सरकारने केलेल्या विनंतीवरून ही संमती देण्यात आली आहे. (यावरून पाकचे आतंकवादी स्वरूप लक्षात येते ! – संपादक) लखवी लष्कर-ए-तोयबाचा घातपाती कारवाया घडवून आणणार्‍या गटाचा प्रमुखदेखील आहे. त्याला या दीड लाखामध्ये जेवण (५० सहस्र), औषधे (४५ सहस्र), सार्वजनिक गोष्टींचा वापर (२० सहस्र), अधिवक्त्यांचे शुल्क (२० सहस्र) आणि वाहतूक (१५ सहस्र रुपये) यांचा समावेश आहे. (एका सर्वसामान्य माणसाच्या जेवणावर किंवा अन्य गोष्टींवर एवढा खर्च येतो का ? यावरून पाकमध्ये आतंकवाद्यांची बडदास्त राखली जाते, हे लक्षात येते ! – संपादक)

लखवी वर्ष २०१५ पासून जामिनावर बाहेर आहे. त्याला अटक करण्यात आल्यावर केवळ दाखवण्यासाठी कारागृहात ठेवण्यात आले होते; कारण रावळपिंडीमधील अदियाला कारागृहात असतांनाही तो एका मुलाचा पिता झाला होता.