‘हिंदु राष्ट्र सेने’च्या धाकामुळे तुळजापूर तहसील कार्यालयातील उर्दू भाषेतील फलक हटवला !

हिंदु राष्ट्र सेनेच्या दणक्यानंतर तुळजापूर तहसील कार्यालयातील हटवण्यात आलेला फलक

‘धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने ‘कुष्ठरोग आणि क्षयरोग रुग्ण अभियान-२०२०’ या आशयाचा उर्दू आणि मराठी भाषेतील फलक तुळजापूर येथील तहसील कार्यालयातील आवारात लावण्यात आला होता. या फलकावरील उर्दू भाषेतील लिखाणावर ‘हिंदु राष्ट्र सेने’च्या वतीने आक्षेप घेण्यात आला. हा फलक तात्काळ हटवण्यासाठी पू. महंत मावजीनाथजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली हिंदु राष्ट्र सेनेच्या वतीने तुळजापूर येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामुळे तहसील कार्यालयातील उर्दू भाषेतील फलक तातडीने  हटवण्यात आला.

या निवेदनात म्हटले होते की, 

१. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य असतांना उर्दू भाषेत फलक प्रसिद्ध करणे म्हणजे पुन्हा एकदा मोगल आणि निजाम यांची सत्ता स्थापन करण्याचे षड्यंत्र तर नाही ना ?

२. उर्दू ही राज्य किंवा राष्ट्र भाषा नाही. तरीही असे फलक छापून ते तहसील कार्यालयात लावण्यामागील सरकारचा हेतू काय आहे, हे जनतेला समजले पाहिजे. याविषयी सरकारने लेखी स्वरूपात आपला खुलासा करावा.

३. तसेच संबंधित फलकावरील उर्दू  भाषा तात्काळ हटवून राज्य आणि राष्ट्र भाषेमध्ये फलकप्रसिद्धी करावी, अन्यथा वैध मार्गाने आंदोलन करण्यात येईल.’