संस्था आणि संघटना यांच्या कार्यातील भेद

समाजातील एखाद्याच प्रश्नापुरती संघटनेची दृष्टी संकुचित असून चालत नाही. तशी दृष्टी असेल, तर ती एक संस्था म्हणावी लागेल. संस्था आणि संघटना यात महद् अंतर असते. संस्था काही विशिष्ट मर्यादित प्रश्नांचा विचार आणि व्यवहार करत असते. ती मर्यादित असते; उलट संघटनेच्या व्याप्तीला मर्यादा नाही, ती अनंत असते. एखाद्या व्यक्तीसाठी, एखाद्या विशिष्ट प्रश्नासाठी, एखाद्या विशिष्ट परिस्थितीसाठी ती निर्माणच झालेली नसते. तिचे असणे, अस्तित्व हाच स्वभाव, हीच तिची प्रकृती. यास्तव अस्पृश्यता निवारण हे जसे हिंदुस्थानच्या राष्ट्रीय संघटनेचे ध्येय असू शकत नाही, तसेच राष्ट्रीय स्वातंत्र्य हेही केवळ त्या संघटनेचे ध्येय असणार नाही.

(साभार : ग्रंथ ‘अज्ञाताची वचने’, संचालक : अमरेंद्र गाडगीळ)