मुंबई – विरोधाला विरोध म्हणून विरोधक कृषी कायद्याला विरोध करत आहेत. जे पक्ष भारत बंदला पाठिंबा देत आहेत, ते ‘बहती गंगामें हात धोना’ या म्हणीला अनुसरून वागत आहेत. कृषी कायद्याच्या माध्यमातून देशात अराजक निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. केंद्रशासनाच्या कृषी कायद्याच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाविषयी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना त्यांनी वरील वक्तव्य केले.
या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘वर्ष २०१० मध्ये शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असतांना त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले होते. त्यामध्ये त्यांनी ‘एपीएम्सी’ कायद्यात पालट करण्याची आवश्यकता आहे’, असे म्हटले होते. त्यांनी या कायद्याला विरोध केला नसून केवळ काही तत्त्वांना विरोध दर्शवला आहे. शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये ‘देशात प्रतिवर्षी ५५ सहस्र कोटी रुपयांचा शेतमाल वाया जातो. ही मोठी हानी आहे. ‘शेतमाल केवळ ‘एपीएम्सी’ मध्येच विकला गेला पाहिजे’, हा नियम आता पालटला जायला हवा’, अशी मागणी केली आहे.
आज केवळ मा. नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारला विरोध आणि विरोधासाठी विरोध!
(पत्रपरिषद । मुंबई । दि. 7 डिसेंबर 2020) pic.twitter.com/yryJVLv6gf— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 8, 2020
शिवसेनेने तर फळे आणि भाजीपाला नियमनमुक्त करण्याला समर्थन दिले होते. हे कायदे मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात लागू आहेतच. त्यामुळे मोदी शासनाला विरोध करण्यासाठी या कायद्यांना विरोध केला जात आहे.’’