पोलीस, महानगरपालिका आणि महसूल विभाग संयुक्तपणे मोहीम राबवणार !

छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यात बांगलादेशी नागरिकांच्या शोधासाठी प्रशासनाच्या वतीने पुढाकार घेण्यात येणार आहे. त्यासाठी पोलीस, महानगरपालिका आणि महसूल विभाग यांची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या तिन्ही विभागांच्या वतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या माध्यमातून बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यात येणार असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री संजय शिरसाट यांनी २० जानेवारी या दिवशी दिली. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी सिल्लोडमध्ये बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्याला असल्याचे वक्तव्य केले होते.
बांगलादेशींना साहाय्य करणार्यांच्या विरोधातही कारवाई !
शिरसाट म्हणाले की, १५ दिवस घरोघरी जाऊन माहिती घेणार आहोत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी बनावट आधारकार्ड काढणारी टोळी आहे. या माध्यमातून त्यांचाही शोध घेतला जाणार आहे. त्यामुळे १५ दिवसांनंतर एकही बांगलादेशी या ठिकाणी रहाणार नाही. या प्रकरणात सिल्लोड मतदारसंघात असो अथवा माझ्या मतदारसंघात, बांगलादेशी असतील, तर त्यांच्यावर कारवाई होईल, त्यांना साहाय्य करणार्यांच्या विरोधातही कारवाई केली जाईल.