रामनाथी (गोवा) – गौरीगद्दे (शृंगेरी, कर्नाटक) येथील अवधूत विनयगुरुजी यांनी नुकतीच येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी सनातन संस्था आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय या संस्थांच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली. सनातनचे संत पू. पद्माकर होनप यांनी अवधूत विनयगुरुजी यांचा पुष्पहार, शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. या वेळी अवधूत विनयगुरुजी यांचे भक्त सर्वश्री शिवकुमार, गुरुदर्शन, मौलाजी हेही उपस्थित होते. तीव्र शारीरिक त्रास होत असूनही परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अवधूत विनयगुरुजी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
अवधूत विनयगुरुजी यांचा परिचयअवधूत विनयगुरुजी यांचा गौरीगद्दे येथे ‘दत्ताश्रम’ असून तेथे प्रतिदिन शेकडो भक्त स्वतःच्या व्यावहारिक आणि अन्य समस्या विचारण्यासाठी येत असतात. स्वामीजी त्यांच्याकडे आलेल्यांच्या समस्या त्यांना न विचारता अंतर्ज्ञानाने जाणून त्याविषयी उत्तरे आणि उपाय सांगतात. दोन वर्षांपूर्वी सनातन संस्थेचे साधक श्री. राम होनप हे अवधूत विनयगुरुजी यांच्याकडे गेले होते. त्या वेळी श्री. राम होनप यांनी त्यांना राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रश्न विचारण्यापूर्वीच अवधूत विनयगुरुजींनी अंतर्ज्ञानाने त्या प्रश्नांची उत्तरे दिली. |
सनातनचा आश्रम म्हणजे विद्यावाचस्पति (पी. एचडी.) बनवणारे विश्वविद्यालय !
अवधूत विनयगुरुजी यांनी सनातन आश्रमाविषयी काढलेले गौरवोद्गार
सनातनचा आश्रम हा सर्व साधकांचे ‘विश्वघर’ आहे, हे (सनातन आश्रमात) अध्यात्मातील सत्-चित्-आनंदस्वरूप विश्वविद्यालय आहे. माझा आश्रम आधिभौतिक शाळा, तर सनातनचा आश्रम आध्यात्मिक शाळा म्हणजे विद्यावाचस्पति (पी. एचडी. ) बनवणारे विश्वविद्यालय आहे. ही अध्यात्मातील संशोधनाची प्रयोगशाळा आहे. येथे रहाण्यासाठी येणार्या व्यक्तीची स्वार्थी इच्छा साधनेने दूर होऊन ती निरिच्छ बनते. येथील साधक त्यांचे तन, मन आणि धन या सर्वांचा त्याग करून जीवनमुक्त होत आहेत. (Seekers are giving everything and moving to nothing.)
अवधूत विनयगुरुजी यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी आणि त्यांच्या कार्याविषयी काढलेले गौरवोद्गार१. परात्पर गुरुदेवांमध्ये विष्णुतत्त्व असून त्यांचा भक्तांच्या कल्याणासाठी अवतार झाला आहे ! परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतः परमात्मा आहेत, तसेच त्यांची शिकवण मौन, महामौन आणि ध्यान अशी आहे. परात्पर गुरुदेवांमध्ये विष्णुतत्त्व असून त्यांच्यामध्ये विष्णूची शक्ती कार्यरत आहे. त्यांचा कारणदेह वैकुंठातून असून त्यांच्यात वैष्णवी शक्ती सतत कार्यरत असते. परात्पर गुरुदेवांना स्वतःचे असे प्रारब्ध नसून त्यांचा भक्तांच्या (साधकांच्या) कल्याणासाठी अवतार झाला आहे. ज्याप्रमाणे प्रभु श्रीरामाला प्रारब्ध होते; पण ते लोककल्याणाकरता घेऊन आले, त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आहे. २. परात्पर गुरु डॉ. आठवले हे अमर्याद आहेत ! राम-कृष्ण यांच्याप्रमाणे परात्पर गुरुदेवांचा अवतार झाला असून संपूर्ण विश्वाला ज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी त्यांचा जन्म झाला आहे. त्यांचे प्रत्येक कर्म निष्काम आहे. याचसमवेत त्यांचा जन्म विश्वात हिंदु धर्माची प्रतिष्ठापना आणि सर्वांमध्ये धर्माची स्थापना करण्यासाठी झाला आहे. ते दयेचे सागर असून त्यांच्यामध्ये उच्च-नीच असा भेदभाव नाही. त्यांच्यामध्ये मातृ-पितृ असे दोन्हींचे प्रेम असून त्याप्रमाणे त्यांची शक्ती कार्य करत असते. त्यांच्यात शिव आणि शक्ती या दोघांचा संगम आहे. परात्पर गुरुदेवांची स्थिती परमहंस योगानंद यांच्यासारखी आहे. माया ही परात्पर गुरुदेवांच्या अधीन असल्यामुळे त्यांच्यावर मायेची जादू चालत नाही. परात्पर गुरुदेवांमध्ये शाश्वत आनंद आहे. त्यांच्याकडे डोळे बंद करून पाहिल्यावर ईश्वराचा निर्गुण रूपातील प्रकाश जाणवतो. परात्पर गुरु डॉ. आठवले हे अमर्याद (Infinite) आहेत. |