(म्हणे) ‘बाबरी मशीद ४०० वर्षे उभी होती, हे पुढच्या पिढीला सांगणार !’ – असदुद्दीन ओवैसी

भगवान श्रीराम यांचे या ठिकाणी त्यापूर्वी शेकडो वर्षे मंदिर होते आणि ते पाडूनच मशीद बांधण्यात आली, हे न्यायालयात स्पष्ट झाले आहे, हे ओवैसी का लपवत आहेत ? हे त्यांनी सांगावे !

असदुद्दीन ओवैसी

भाग्यनगर (तेलंगाणा) – अयोध्येत बाबरी मशीद ४०० वर्षे उभी होती, याची येणार्‍या पिढ्यांना आठवण करून द्यावी, असे आवाहन एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्या समर्थकांना ट्वीट करून केले आहे.

ओवैसी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आमच्या पूर्वजांनी तेथे एकत्रितपणे नमाजपठण केले होते. तेथे त्यांनी त्यांचे रोजेही सोडले होते. जेव्हा त्यांचा मृत्यू होत असे, तेव्हा त्यांना याच परिसरात दफन केले जात असे. ६ डिसेंबर १९९२ मध्ये संपूर्ण जगासमोर आमची मशीद ध्वस्त करण्यात आली होती. जे याला उत्तरदायी होते, त्यांना एका दिवसाची देखील शिक्षा मिळाली नाही.’ (ज्यांनी येथे असलेले मंदिर ५०० वर्षांपूर्वी पाडले, त्यांना शिक्षा मिळाली नव्हती, हे ओवैसी का सांगत नाहीत ? मंदिर पाडून मशीद बांधणारे ओवैसी यांचे कोण लागतात, हेही त्यांनी सांगावे ! – संपादक)

अयोध्येतील वाद संपल्याने आता ‘काळा’ किंवा ‘विजय’ दिवस पाळू नये ! – इक्बाल अन्सारी

अयोध्या (उत्तरप्रदेश) – अयोध्येतील श्रीराममंदिर आणि बाबरी ढाचा यांचा वाद न्यायालयाच्या आदेशानंतर संपुष्टात आल्याने आता कुणीही ६ डिसेंबर हा ‘काळा दिवस’ किंवा ‘विजय दिवस’ म्हणून पाळू नये, असे आवाहन बाबरीचे पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारी यांनी केले आहे. ‘आता मंदिर आणि मशीद दोघांचेही अयोध्येत बांधकाम होत आहे. त्यामुळे लोकांनी आता हा वाद विसरून विकासाची गोष्ट केली पाहिजे आणि दोन्ही धर्मियांनी एकत्र बंधूभावाने राहिले पाहिजे’, असेही ते म्हणाले.