कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला सामोरे जाण्याची गोव्याने सिद्धता ठेवावी ! – डॉ. शिवानंद बांदेकर, डीन, गोवा वैद्यकीय महाविद्यालय

डॉ. शिवानंद बांदेकर

पणजी, ३ डिसेंबर (वार्ता.) – देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. याच धर्तीवर गोव्यानेही कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी  सिद्धता ठेवावी, असे आवाहन गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी केले आहे. डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हे आावहन केले.

डीन डॉ. शिवानंद बांदेकर पुढे म्हणाले, ‘‘कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत; मात्र कोरोनाची दुसरी लाट गोव्यात येऊ नये, यासाठी प्रत्येकाने कोरोनाची लक्षणे जाणवल्यास त्वरित उपाय करणे, आदींच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत. यापुढे कोरोनाची बाधा झालेल्या गंभीर रुग्णांवर गोवा वैद्यकीय महाविद्यालयात आणि इतरांवर मडगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ‘व्हेंटिलेटर’ची कमतरता नाही.’’