लडाखमधील चीनचे बांधकाम ही चिथावणीखोर कृती ! – अमेरिकी सिनेटर राजा कृष्णमूर्ती यांची टीका

अमेरिकेचे सिनेटर असे उघडपणे बोलतात; मात्र भारतातील खासदार असे बोलण्याचे धाडस दाखवत नाहीत !

पूर्व लडाखजवळ चीनने एलएसी बाजूने लष्करी बांधणी सुरू ठेवली
अमेरिकी सिनेटर राजा कृष्णमूर्ती

वॉशिंग्टन (अमेरिका) – लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनकडून बांधकाम करण्यात येत असेल, तर ही चिथावणीखोर कृती आहे. दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनकडून होत असलेल्या वागणुकीसारखीच ही कृती आहे, अशी टीका अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाचे लोकप्रतिनिधी राजा कृष्णमूर्ती यांनी केली आहे. कृष्णमूर्ती अमेरिकी काँग्रेसच्या गुप्तचरविषयक कायम समितीचे सदस्य आहेत. या समितीवर नियुक्त करण्यात आलेले ते पहिलेच भारतीय-अमेरिकी लोकप्रतिनिधी आहेत.

बायडेन यांच्या काळामध्ये दोन्ही देशांमधील संबंध नव्या उंचीला पोचतील

कृष्णमूर्ती म्हणाले की, लडाख सीमेवर बांधकाम हा दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या दादागिरीसारखाच प्रकार आहे. या समुद्रामध्ये चीनने स्वतःचे बेट उभारले. या भागातील वास्तव पालटण्याचा त्याचा प्रयत्न आहे. सध्याचे ट्रम्प यांचे सरकार आणि आगामी जो बायडेन यांचे सरकार भारताच्या बाजूनेच उभे रहाणार आहे. बायडेन हे दीर्घ काळापासून भारताचे मित्र आहेत. आता त्यांच्यासमवेतच भारतीय वंशाच्या कमला हॅरिसही उपाध्यक्षपदी असतील. हॅरिस यांच्या निवडीमुळे भारतीय वंशाचीच व्यक्ती महत्त्वाच्या पदावर आली आहे आणि ही गोष्ट अमेरिका-भारत संबंधांना आणखी मजबूत करणारी आहे.

परराष्ट्रमंत्री पदासाठी अँथनी ब्लिकन यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. त्यांना दक्षिण आशियाची चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तेही भारताचे मित्र आहेत. त्यामुळे बायडेन यांच्या काळामध्ये दोन्ही देशांमधील संबंध नव्या उंचीला पोचतील.’