लेप्टोस्पायरोसिस, अतीसार, मलेरिया आणि डेंग्यू या आजारांविषयी सतर्क रहा ! – डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी, सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसिस, अतीसार, मलेरिया, डेंग्यूसदृश ताप यांचे रुग्ण आढळून येत आहेत. या रोगाच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्ययंत्रणेद्वारे आवश्यक त्या उपाययोजना चालू करण्यात आल्या आहेत, तरीही जनतेने सतर्क राहून आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी केली आहे.

याविषयी डॉ. खलिपे यांनी सांगितले की, ताप, अंगदु:खी, थंडी वाजणे, स्नायूवेदना होणे, लघवी पिवळी होणे आदी लक्षणे असलेल्या रुग्णांनी त्वरित जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय येथे उपचार घ्यावेत. हातापायाला जखम झालेल्या रुग्णांनी दूषित पाणी, दूषित माती आणि साचलेल्या पाण्यापासून दूर रहावे. रबरी बूट आणि हातमोजे यांचा वापर करावा. जनावरांच्या मलमूत्राशी संपर्क टाळावा. शेतीच्या हंगामात काम करणार्‍या शेतकर्‍यांनी जखम असल्यास त्याला ‘बॅन्डेज’ करावे. पाळीव प्राणी मांजर, कुत्रा यांच्या संपर्कात येऊ नये. घरातील आणि घराशेजारील परिसर स्वच्छ ठेवावा. ब्लिचिंग पावडरने निर्जंतुकीकरण करावे, उकळलेले पाणी प्यावे. उंदीर, घुशी यांचा नायनाट करावा. नियमित ताजे आणि गरम अन्न खावे. बाहेरून आणि शौचालयातून आल्यानंतर हात-पाय स्वच्छ साबणाने धुवावेत. या रोगाचे निदान रक्त आणि लघवी तपासून करता येते. त्यासाठी उपजिल्हा रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालय येथे याविषयीच्या सेवा देण्यात येत आहेत. तरी जनतेने याविषयी सतर्क राहून आरोग्य विभागाला सहकार्य करावे.

वेळेत उपचार घेतल्यास लेप्टो पूर्णत: बरा होतो ! – राजेंद्र पराडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी

लेप्टोस्पायरोसिस अर्थात लेप्टो हा आजार वेळेत योग्य उपचार घेतल्यास पूर्णत: बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी या आजारामुळे घाबरून न जाता शासकीय आरोग्ययंत्रणेद्वारे उपचार घ्यावेत. या आजाराच्या पार्श्‍वभूमीवर सर्वेक्षणासाठी येणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांना योग्य आणि खरी माहिती द्यावी. ताप आल्यास सांगण्याचे टाळू नये, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्ह्यात आतापर्यंत  लेप्टोचे एकूण १६५ रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत लेप्टोचे एकूण १६५ रुग्ण आढळले आहेत. त्यातील ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या आजाराविषयी २१७ गावे जोखीमग्रस्त म्हणून निश्‍चित करण्यात आली आहेत. २१ सहस्र ८५६ नागरिक या बाधित क्षेत्रात येत असून प्रतिबंधात्मक औषधांचे वितरण करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली.