‘शॉर्ट्स’द्वारे (तोकडे कपडे) गणपतीचे विडंबन करणार्‍या ब्राझिलच्या आस्थापनाने मागितली क्षमा !

ब्राझिलमधील हिंदूंच्या संघटित विरोधाचा परिणाम !

  • हिंदूंनो, या यशासाठी भगवंताच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा !
  • हिंदु देवतांचे विडंबन झाल्यावर त्यास तत्परतेने विरोध करणारे ब्राझिलमधील हिंदू ! भारतात प्रतिदिन विविध माध्यमांतून देवता, प्रथा-परंपरा आदींचा अनादर होऊनही त्यावर काही न बोलणारे भारतातील बहुसंख्यांक हिंदू ब्राझिलमधील हिंदूंकडून काही बोध घेतील का ?

नवी देहली – दक्षिण अमेरिकन देश ब्राझिलमधील हिंदूंच्या संघटित विरोधामुळे तेथील ‘जॉन कॉट्रे’ या आस्थापनाने गणपतीचे विडंबन करणारे विज्ञापन अखेर मागे घेतले. या विज्ञापनात महिला आणि पुरुष यांनी गणपतीचे चित्र असलेले ‘शॉर्ट्स’ (तोकडे कपडे) घातलेले दाखवण्यात आले होते.

(ही छायाचित्रे छापण्यामागे लोकांच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नसून केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने ही प्रसिद्ध केली आहेत. –  संपादक)

हे विज्ञापन झळकल्यापासून आस्थापनाला विरोध चालू झाला होता. ब्राझिलमधील हिंदूंनी आस्थापनावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत विज्ञापन तात्काळ मागे घेण्याची मागणी केली होती.

भारताचे ब्राझिलमधील राजदूत सुरेश रेड्डी

हिंदूंच्या वाढत्या विरोधाची दखल घेत भारताचे ब्राझिलमधील राजदूत सुरेश रेड्डी यांनीही आस्थापनाला संपर्क साधून हे सूत्र संवेदनशील असल्याचे सांगितले. वाढत्या विरोधानंतर अखेर आस्थापनाने ते विज्ञापन हटवले आणि हिंदूंची क्षमाही मागितली. तसेच या ‘शॉर्ट्स’चे उत्पादनही थांबवण्यात आले असल्याची माहिती साओ पाउलो येथील त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली.