‘भारतमाता की जय’ संघटनेच्या वतीने मुरगाव येथे ‘दिवाळी मीलन’ कार्यक्रम
पणजी – गोव्यात धर्मांतराची प्रकरणे वाढत आहेत. याला आळा घालण्यासाठी हिंदूंची वैचारिक एकवट, ही काळाची आवश्यकता असल्याचे मत श्री. गणेश गावडे यांनी व्यक्त केले. ‘भारतमाता की जय’ संघटनेच्या मुरगाव शाखेच्या वतीने ‘दिवाळी मीलन कार्यक्रम’ श्रीराम मंदिर, मेस्तावाडा येथील सभागृहात नुकताच पार पडला. या कार्यक्रमात श्री. गणेश गावडे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी ‘भारत माता की जय’चे संरक्षक
श्री. कृष्णराव बांदोडकर, श्री. आनंद गुरव, श्री. संजय नाईक, डॉ. नितीन मांजरेकर, सर्वश्री रामकृष्ण होन्नावरकर, गुरु नागवेकर, नारायण पार्सेकर, मंगेश तुळसकर, योगेश शेट तानावडे, समीर खुटवाळकर, रुद्रेश्वर च्यारी, सखाराम भगत, विष्णु काणेकर, सुरेश भोसले, राजाराम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
मुरगाव येथे ‘भारतमाता की जय’ने अनेक उपक्रम हाती घेऊन समाजातील अनेकांना साहाय्य केले आहे. समाजात ताठ मानेने उभा रहावा, हीच श्रींची इच्छा असून ‘भारत माता की जय’ त्या मार्गाने काम करत आहे. आपण सर्वजण अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून हिंदु समाजावर गोव्यात येऊ घातलेल्या संकटावर मात करू, असे श्री. गावडे या वेळी म्हणाले. मुरगाव तालुका संरक्षक श्री. कृष्णराव बांदोडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. प्रारंभी स्थानिक महिला मंडळाच्या वतीने ‘राम धुन राम गजर’ करण्यात आल्याने वातावरण मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर श्री. गुरुदेव च्यारी आणि त्यांचे सहकारी यांनी रामायणातील निवडक गाणी सादर करून वातावरण पूर्ण राममय करून टाकले. उपस्थित सर्व लोकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन श्री. नितीन फळदेसाई यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्री. साईनाथ नाईक यांनी केले. सर्वांना फराळ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. श्रीराम मंदिर संस्थेचे अध्यक्ष आणि संपूर्ण समिती यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोठे योगदान दिले.