Supreme Court On Waqf Board Member Rules : केवळ बार कौन्सिलचे सदस्यच बनू शकतील वक्फ बोर्डाचे सदस्य !

मणीपूर उच्च न्यायालयाचा आदेश रहित करत सर्वाेच्च न्यायालयाचा निर्णय

नवी देहली – राज्य बार कौन्सिलचा सक्रीय सदस्यच राज्य वक्फ बोर्डाचा सदस्य बनू शकतो, असा निर्णय सर्वाेच्च न्यायालयाने दिला. वक्फ बोर्डाचे सदस्य बनण्यासाठी संबंधित व्यक्ती मुसलमान असण्यासह संसद, राज्य विधानसभा किंवा बार कौन्सिलचे सदस्य म्हणून सक्रीय पद असावे लागते.

१. महंमद फिरोज अहमद खालिद यांची फेब्रुवारी २०२३ मध्ये मणीपूर वक्फ बोर्डाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. डिसेंबर २०२२ च्या निवडणुकीत बार कौन्सिलचे सदस्य झाल्यानंतर ते वक्फ बोर्डात सहभागी झाले होते. त्यांनी बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या व्यक्तीची जागा घेतली होती.

२. उच्च न्यायालयाने खालिद यांची नियुक्ती कायम ठेवली होती. न्यायालयाने म्हटले होते की, बार कौन्सिलमधून त्यांची हकालपट्टी केल्याने वक्फ बोर्डाचे सदस्यत्व संपुष्टात येईल, हे कायद्यात स्पष्ट नाही.

३. यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, वक्फ कायद्यानुसार जर बार कौन्सिलचे सदस्यत्व संपुष्टात आले, तर वक्फ बोर्डाचे सदस्यत्व आपोआप रहित मानले जाईल.