वीजमीटर खंडित कराल, तर खबरदार ! – गणेश नाईक, आमदार, भाजप

नवी मुंबई – कोरोनाच्या काळात जनतेवर लादलेली वाढीव वीजदेयके तातडीने रहित करा, अशी मागणी करत ‘ग्राहकांचे वीजमीटर खंडित करण्यासाठी आलात, तर खबरदार’, अशी चेतावणी आमदार गणेश नाईक यांनी महावितरणला दिली आहे. ‘अशी कारवाई करण्यासाठी जर महावितरणचे कर्मचारी आले, तर नागरिकांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगावे’, असे आवाहन गणेश नाईक यांनी केले आहे.

आमदार गणेश नाईक

वाढीव वीजदेयकांच्या विरोधात भाजपच्या वतीने संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात आले. नवी मुंबई शहरात भाजपच्या वतीने प्रत्येक प्रभागामध्ये हे आंदोलन पार पडले. वाशी सेक्टर १७ येथील महावितरण कार्यालयासमोर गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.

ग्राहकांना महावितरणने वेळेवर देयके दिली नाहीत. चुकीच्या रिडिंगमुळे, वाढीव युनिटमुळे आणि वाढवलेल्या दरांमुळे देयकांची रक्कम वाढली आहे. कोरोनाच्या काळात नागरिकांची आर्थिक स्थिती खालावली असतांना मोठया रक्कमेची देयके जनता कशी भरणार ? असा प्रश्‍न नाईक यांनी उपस्थित केला.

चुकीची आणि वाढीव देयके सुधारित करून परत द्यावीत, वीजदेयकात सवलत द्यावी, वाढवलेले वीजदर न्यून करावेत आणि ज्यांनी देयके भरली आहेत, त्यांचे पैसे पुढील देयकात वळते करावेत, अशा मागण्या या वेळी सरकारकडे केल्या. जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर पुन्हा रस्त्यावर उतरण्याची चेतावणी नाईक यांनी दिली.