मोरजी (गोवा) येथील अनेक भूखंड देहली येथील बांधकाम व्यावसायिक आणि रशियाचे नागरिक यांच्या कह्यात !

  • मोरजी येथील धार्मिक स्थळांचे घरक्रमांक परस्पर भलत्यांच्या नावे करून बांधकाम व्यावसायिकांना ती विकल्याचे उघड !

  • प्रकरण उघडकीस आणल्यास गोळ्या झाडून तुम्हाला ठार करू, अशी धमकी !

मोरजीतील भूखंड परप्रांतीय आणि विदेशी यांच्या कह्यात जात असतांना स्वतःला ‘गोमंतकियांसाठी झटणार्‍या’ म्हणणार्‍या संघटना गप्प का ?

प्रतिकात्मक छायाचित्र

पेडणे, २३ नोव्हेंबर (वार्ता.) – पेडणे तालुक्यातील समुद्रकिनार्‍यांवरील मोरजी या गावातील भूखंड देहली येथील बांधकाम व्यावसायिक आणि रशियाचे नागरिक यांनी कह्यात घेतले आहेत. येथील स्थानिक नागरिकांनी कोट्यवधी रुपयांना त्यांची भूमी विकली. आता या भूमीच्या विकासासाठी इतर स्थानिक नागरिकांना वेठीस धरले जात आहे. मोरजी गावात अनेक प्राचीन धार्मिक स्थळे आहेत. त्यांना घरक्रमांक दिले होते. या धार्मिक स्थळांचे घरक्रमांक परस्पर भलत्या माणसांच्या नावे करून तीही मोठ्या बांधकाम व्यावसायिकांना विकण्यात आल्याची माहिती येथील एक नागरिक गौतम शेटगावकर यांनी उघडकीस आणली आहे. (मोरजी येथील अनेक भूखंड रशियाच्या नागरिकांनी घेतल्याचे अनेक वर्षांपूर्वी उघड झाले होते. त्यांनी येथे रशियाच्या नागरिकांचे छोटेसे गावच वसवले आहे. हे रशियाचे नागरिक या ठिकाणी टॅक्सीचा व्यवसायही करतात; पण आतापर्यंतच्या कोणत्याही शासनकर्त्यांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. आता पूर्ण मोरजी गाव या लोकांच्या कह्यात गेल्यास आश्‍चर्य वाटायला नको ! – संपादक)

मोरजीतील दाभोळकरवाडा येथील श्री राष्ट्रोळी देवस्थान, तसेच करवणीचो देव या स्थळांचा घरक्रमांक परस्पर दुसर्‍यांना देण्यात आला आहे. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक युवकांनी पंचायतीकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ‘माहिती उपलब्ध नाही’, असे सांगण्यात आले. ‘हे प्रकरण उघडकीस आणल्यास तुमच्यावर गोळ्या झाडून तुम्हाला ठार करू’, अशी धमकी त्यांना देण्यात आल्याचे समजते.

पंचांना कोट्यवधींची आमिषे दाखवली जात असून अवैध कृत्यांच्या विरोधात बोलणार्‍यांना धमक्या दिल्या जात असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. मोरजी गाव सध्या उत्तर भारतीय आणि देहली येथील बांधकाम व्यावसायिक यांनी कह्यात घेतले आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग आणि अन्य भूखंड विकत घेतले आहेत. अनेक वर्षांपासूनचे पारंपरिक रस्ते, पायवाटा बंद केल्या जात आहेत. पंचायत मंडळाला आमिषे दाखवून आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न चालू असल्याने पंच स्थानिक लोकांना साहाय्य न करता परप्रांतीय बांधकाम व्यावसायिकांना साथ देत असल्याचा आरोप येथील एक नागरिक गौतम शेटगावकर यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मोरजीत सध्या कोणतेच कायदे लागू नाहीत. एन्डीझेड् क्षेत्रातही बांधकामे चालू आहेत. याच्या विरोधात तक्रार नोंद करणार्‍यांचा त्यांच्या घरांच्या मालकी हक्कांचे विषय काढून छळ केला जात आहे. माहितीच्या अधिकाराखाली तक्रार करणार्‍यांना ‘ब्लॅकमेलर्स’ संबोधून त्यांची अपकीर्ती केली जात आहे. आमदारांकडे तक्रार केल्यास त्यांच्याकडूनही विशेष प्रतिसाद मिळत नाही. ही परिस्थिती अशीच राहिल्यास मोरजीवासियांवर स्थलांतर करण्याची पाळी येईल.