गोवंश हत्याबंदी कायदा असतांना गोवंशियांच्या मांसाची मोठ्या प्रमाणात तस्करी होणे हे प्रशासनाचे अपयशच होय. गोतस्कर आणि गोहत्या करणारे यांना कठोर शिक्षा न केल्याचेच हे फलित आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
सातारा, १७ नोव्हेंबर (वार्ता.) – जांब (जिल्हा सातारा) येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी अनिकेत शिंदे, हर्षद शिंदे, प्रणित कदम आणि ऋषिकेश गायकवाड यांनी गोवंशियांच्या ३ ते ४ टन मांसाची तस्करी थांबवून ऐन दिवाळीत धर्मकर्तव्य पार पाडले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून ट्रक आणि एक चारचाकी कह्यात घेतली आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, १५ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता सुरूर-वेळे रस्त्यावर एका आयशर ट्रकमधून दुर्गंध आल्याने गोवशियांचे मांस असल्याचा संशय धारकरी अनिकेत शिंदे आणि त्यांचे सहकारी यांना आला. त्यांनी ट्रक चालकाला याविषयी विचारले असता त्याने वाहनात गायी, वळू, बैल आदींचे मांस असल्याचे मान्य केले. तसेच गाडीच्या पुढील बाजूस चारचाकीमध्ये ट्रक चालकाचा सहकारी असल्याचे समजले. त्यांच्याकडे चौकशी केली असता, गोवंशियांच्या मांसाची वाहतूक करण्याचे कोणतेही अनुमतीपत्र नसल्याचे धारकरी अनिकेत शिंदे आणि त्यांच्या सहकारी यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन पहाणी केली असता वाहनचालक तथा त्यांचे सहकारी यांच्याकडे पशूसंवर्धन विभागाचे कोणतेही अनुमतीपत्र आढळून आले नाही. तसेच गोमांस तस्करांकडून सातारा जिल्हाधिकार्यांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दिलेल्या आदेशांचा भंग केल्याचेही निदर्शनास आले. गोमांस तस्करांनी विनाअनुमती गोवंश कापणे, वाहतूक करणे, विक्रीसाठी बंदी असतांना गाय, वळू, बैल यांच्या मांसांची अनधिकृत वाहतूक करून कोरोना पसरवण्याचे घातक कृत्य केले आहे. त्यामुळे गोमांस तस्करांच्या विरोधात महाराष्ट्र पशूसंरक्षण अधिनियम १९७६ कलम ५ सी आणि ९ ए अन् भारतीय दंड विधान १८६० कलम २६९, १८८ आणि ३४ अन्वेये भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.