हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पूर्वोत्तर भारतात ‘ऑनलाईन’ महिला शौर्यजागृती शिबिराचे आयोजन

स्वसंरक्षण शिकून ते इतरांनाही शिकवण्याचा शिबिरार्थ्यांचा निर्धार

वाराणसी (उत्तरप्रदेश) – आज देशभरातील महिला विनयभंग, बलात्कार, हत्या आणि लव्ह जिहाद यांसारख्या विविध अत्याचारांनी पीडित आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पूर्वोत्तर भारताच्या महिलांसाठी १० दिवसीय ‘ऑनलाईन‘ महिला शौर्यजागृती शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या शिबिराला उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आाणि ओडिशा या राज्यांतील अनेक युवती आणि महिला यांनी सहभाग घेतला. या वेळी उपस्थित युवती आणि महिला यांनी स्वरक्षण शिकून ते इतरांनाही शिकवण्याचा निर्धार व्यक्त केला.

शिबिराच्या समारोपाच्या वेळी समितीचे युवा संघटक श्री. हर्षद खानविलकर यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना ‘समाजाची वर्तमान स्थिती, तसेच आपत्काळाच्या दृष्टीने साधना आणि स्वरक्षण यांची आवश्यकता’, या विषयावर प्रबोधन केले. ते म्हणाले, ‘‘दिवसाढवळ्या महिलांवर अत्याचार होत आहेत. तुम्हा सर्वांमध्ये दुर्गादेवीची शक्ती आहे. आता कोणतीही मुुलगी निकिता तोमर प्रमाणे बळी पडू नये, यासाठी प्रयत्नरत राहूया.’’ शेवटच्या सत्रात अनुभवकथन झाले. प्रशिक्षणार्थींमधील काही युवतींनी स्वरक्षण स्वत: शिकून इतरांनाही शिकवण्याची इच्छा व्यक्त केली.

अभिप्राय

अधिवक्ता सुगंधा : पूर्वी आपल्यावर अनिष्ट प्रसंग ओढवला, तर प्रतिकार करू शकेल, असा आत्मविश्‍वास नव्हता; परंतु या शिबिराच्या माध्यमातून तो निर्माण झाला आहे.

कु. निधी झा : मी जम्मू येथे शिकत आहे. स्वत:च्या बचावासाठी आपल्याकडील वस्तूंचा वापर कसा करावा, हे या शिबिरातून शिकायला मिळाले. आत्मबळ वाढले आहे. आता राष्ट्र आणि धर्म यांविरोधात कुणी काही बोलल्यास त्याचा प्रतिकार करू शकते.

कु. रूपम चौरसिया : यापूर्वी असे प्रशिक्षण घेतले आहे; परंतु त्याला भावाची जोड कशी द्यायची, हे शिकायला मिळाले. त्यामुळे उत्साह वाढला. मला स्वप्नामध्ये दिसले की, ३ ते ४ जण माझ्याकडे येत आहेत. प्रारंभी मला भीती वाटली. नंतर मी ‘जय भवानी’ असा जयघोष करून त्यांचा प्रतिकार केला.

कु. आस्था पांडेय : मनातील भीती नाहीशी होऊन आत्मविश्‍वास वाढला, तसेच शरिरामध्ये स्फूर्ती आली आणि सकाळी उठण्यामध्ये नियमितता आली.

सीमा श्रीवास्तव : माझी शारीरिक अस्वस्थता प्रशिक्षणामुळे न्यून झाली. पूर्वी थोड्या कामामुळे थकवा येत असे. आता शारीरिक क्षमता वाढली आहे, असे वाटते. आता मी माझ्या मुलीचे रक्षण करू शकते. परात्पर गुरुदेवांविषयी कृतज्ञता वाटली.

सुनीता विश्‍वकर्मा : ९ दिवसांच्या प्रशिक्षणवर्गामध्ये मला दुर्गादेवीच्या ९ रूपांचे तत्त्व, तसेच आई देवीचे बळ मिळाले. आम्ही हे प्रशिक्षण नियमित करू.