१. स्वातंत्र्यानंतर सैन्याचे आधुनिकीकरण न झाल्याने वर्ष १९६२ च्या युद्धात भारताचा पराभव होणे
‘जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर लालबहाद्दूर शास्त्री हे भारताचे पंतप्रधान झाले. त्यांनी देशाचे नेतृत्व स्वीकारले, तेव्हा देश संकटात होता. नुकतेच वर्ष १९६२ चे भारत-चीन युद्ध झाले होते. पाकिस्तानला वाटले, ‘चीनच्या विरोधात भारताचा पराभव झाला आहे. त्यामुळे काश्मीर घेण्यासाठी ही योग्य वेळ आहे.’ पाकिस्तानने वर्ष १९६५ मध्ये भारताशी युद्ध चालू केले. भारत-चीन युद्धाच्या वेळी भारतीय सैन्याची स्थिती चांगली नव्हती. भारताकडे अतिशय जुनी शस्त्रे होती. भारताकडे सेन्च्युरीयन आणि शेरमान बनावटीचे रणगाडे होते. ते दुसर्या महायुद्धात वापरले गेले होते. भारत सोडला, तर जगात त्याचा कुणीही वापर करत नव्हते. एवढेच नव्हे, तर भारतीय वायूदलाकडे जी विमाने होती, तीही दुसर्या महायुद्धात वापरलेली होती. त्याच्या तुलनेत पाकिस्तानकडे अतिशय आधुनिक शस्त्रे होती. त्यांच्याकडे अमेरिकी बनावटीचे पॅटर्न रणगाडे होते. ‘पॅटर्न’ त्या वेळेचा अतिशय आधुनिक रणगाडा होता. एवढेच नव्हे, तर त्या वेळची आधुनिक जेट विमाने पाकिस्तानकडे होती. आधुनिकतेचा विचार केला, तर पाकिस्तानचे सैन्य भारतापेक्षा पुष्कळ पुढे होते. त्या काळात भारतीय नेतृत्वाने सैन्याच्या शस्त्रसिद्धतेकडे अजिबात लक्ष दिले नव्हते.
वर्ष १९६२ ची गोष्ट आहे. जेव्हा भारतीय सैन्याचे प्रमुख जनरल थिमय्या होते. ते देशाच्या सुरक्षेविषयी नेहरूंशी बोलायला गेले होते. तेव्हा नेहरूंना अतिशय राग आला. नेहरू म्हणाले, ‘‘आपल्याला सैन्याची आवश्यकता नाही. पोलीस आपल्यासाठी पुरेसे आहेत. भारत-चीनमध्ये युद्ध होणार नाही. जर झाले, तर ते मी राजनैतिकदृष्ट्या थांबवू शकतो.’’ वर्ष १९६२ मध्ये भारतीय सैन्याचा नाही, तर आपल्या नेतृत्वाचा पराभव झाला. तो कसा झाला, हा इतिहास सर्वांना ठाऊक आहे. भारताचे सैन्य चांगले होते; परंतु स्वातंत्र्यानंतर ज्या गोेष्टी झाल्या, त्यात सैन्याचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न झाला नव्हता.
२. देशाचे नेतृत्व चांगले असल्याने भारतीय सैन्याने इतिहास घडवणे
वर्ष १९६५ मध्ये पाकिस्तानने भारताच्या विरोधात युद्ध आरंभले, तेव्हा त्यांचे रणगाडे छम्बमार्गे अखनूरकडे येण्यास निघाले. अखनूरजवळ पूंछ राजोरीकडे जाणारा मार्ग होता. तो जर बंद झाला असता, तर आपला पूंछ राजोरीशी संपर्क तुटला असता. हे लक्षात घेऊन सैन्यप्रमुख जनरल जे.एन्. चौधरी त्या वेळचे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याकडे गेले. त्यांना म्हणाले, ‘‘आपण पाकिस्तानच्या सैन्याला थांबवू शकणार नाही. आपल्याला वायूदलाचा वापर करणे आवश्यक झाले आहे.’’ चव्हाण म्हणाले, ‘‘वायूदलाचा वापर करायचा झाल्यास मला संसदेला पटवून द्यावे लागेल.’’ जनरल चौधरी म्हणाले, ‘‘यासाठी आपल्याजवळ अजिबात वेळ नाही. तुम्हालाच निर्णय घ्यावा लागेल, असे झाले नाही, तर आपला मार्ग बंद होईल आणि हा एक मोठा सैनिकी धक्का (सेटबॅक) असेल.’’ चव्हाणांनी त्वरित वायूदल वापरण्याची अनुमती दिली. त्यानंतर ४० मिनिटांच्या आत भारतीय वायूदलाची विमाने आली आणि त्यांनी पाकिस्तानच्या सैन्याला थांबवले. यशवंतराव यांना लढाईचा अनुभव नव्हता; पण नेतृत्व चांगले असेल, तर काय होते, याचे ते उदाहरण होते.
ही लढाई चालू राहिली. एक दिवस अचानक पाकिस्तानने रणगाड्यांसह पंजाबमध्ये प्रवेश केला. जनरल चौधरी तत्कालीन पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांना म्हणाले, ‘‘पाकिस्तानचे सैन्य रणगाड्यांसह आपल्या खेमकरणकडे येत आहे. त्यांना रोखायचे असेल, तर आपल्याला पाकिस्तानच्या विरोधात वेगळी आघाडी उघडावी लागेल आणि आपल्याला त्वरित लाहोरकडे कूच करावे लागेल.’’ शास्त्री म्हणाले, ‘‘नाही ! यासाठी मला संसदेची अनुमती घ्यावी लागेल.’’ जनरल चौधरी म्हणाले, ‘‘यासाठी आपल्याकडे वेळ नाही. तुम्हाला त्वरित होकार द्यावा लागेल.’’ शास्त्री म्हणाले, ‘‘ठीक आहे, आक्रमण करा. पाकिस्तानमध्ये घुसण्याची मी अनुमती देतो.’’ भारतीय सैन्याने वर्ष १९४७ नंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानच्या सियालकोट आणि लाहोर यांच्या दिशेने कूच करणे चालू केले. त्यानंतर जे झाले, तो एक गौरवशाली इतिहास आहे. या लढाईत भारतीय सैन्याने अतिशय चांगले काम बजावले. वर्ष १९६२ च्या धक्क्यानंतर वर्ष १९६५ चे युद्ध जिंकणे, ही भारतासाठी महत्त्वाची गोष्ट होती.
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे