षड्रिपू हे नैसर्गिक असल्यामुळे त्यांचे निर्मूलन करणे शक्य नसले, तरी समाजव्यवस्था उत्तम रहावी, यासाठी ते धार्मिक आणि नैतिक संस्कारांनी आत्मनियंत्रणात ठेवता येतात. धर्माला अनुसरून अर्थार्जन करावे आणि धर्माला अनुसरून कामवासनांची पूर्ती करावी, असे धर्म सांगतो. त्यामुळे व्यक्तीतील काम-क्रोधादी षड्रिपूंवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. धर्म समाजातील प्रत्येक घटकाला कर्तव्यपालन करण्यास शिकवतो. कर्तव्यपालनामुळे प्रत्येक घटकाकडून योग्य किंवा आदर्श कृतीच होते. त्यामुळे स्वभावदोष बळावण्याचे प्रमाण आपोआपच न्यून होते. धर्मच त्याग आणि प्रेम यांसारख्या गुणांचे संवर्धन करून षड्रिपूंवर नियंत्रण मिळवण्यास साहाय्यभूत ठरतो. नैतिक मूल्ये आणि धर्म यांचे पालन केल्यामुळे समाजातील सर्वच घटकांमधील षड्रिपू नियंत्रित रहातात. त्यामुळे दोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे शक्य होते.
स्वभावदोष, अहं आणि षड्रिपू यांच्यावर नियंत्रण राखण्यासाठी धर्मपालन करणेच आवश्यक !
भारतात पूर्वी धर्माधिष्ठित राज्यप्रणाली होती. त्यामुळे धार्मिक नेते ईश्वरप्राप्तीसाठी धर्मपालनाचे महत्त्व ओळखून, सुखप्राप्तीची आणि दुःखनिवृत्तीची अपेक्षा असणारे पुण्याच्या अन् पारितोषिकाच्या लोभाने आणि उर्वरित घटक पापाच्या आणि दंडाच्या भयाने का होईना, धर्मपालन करत असत. त्यामुळे सहाजिकच राज्यकर्ते, प्रजा आणि धार्मिक नेते हे समाजातील सर्वच घटक या ना त्या कारणांमुळे धर्मपालन करत होते; म्हणून त्या घटकांमध्ये अहं, षड्रिपू आणि स्वभावदोष यांचे प्राबल्य न्यून होते. सध्या भारताची निधर्मी राज्यप्रणाली असल्यामुळे समाजाच्या सर्वच स्तरांत धर्माचरणाविषयी उदासीनता दिसून येते. धर्मपालन न केल्यामुळे अहं, षड्रिपू आणि स्वभावदोष यांवर नियंत्रण रहात नाही. त्यामुळे समाजातील सर्व घटकांमधील स्वभावदोष बळावतात. त्यामुळे राष्ट्राची हानी होते.
श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धर्माधिष्ठित राज्यकारभाराचा आदर्श घ्या !
धर्माधिष्ठित राज्यप्रणालीमुळे समाजातील सर्व घटक धर्मपालन करण्यास प्रवृत्त होतात. धर्माधिष्ठित राज्यप्रणालीमुळे दोष आणि अहं यांचे निर्मूलन करणारी, षड्रिपूंना नियंत्रणात ठेवणारी आणि समाजघटकांमध्ये गुणांचे संवर्धन करणारी व्यवस्था आपोआप निर्माण होते. यावरून व्यष्टी आणि समष्टी जीवन सुखी, समृद्ध अन् समाधानी असावे, तसेच समाजातील सर्वच घटकांना आत्मनियंत्रित आणि संयत जीवन जगता यावे, यासाठी निधर्मी नव्हे, तर धर्माधिष्ठित किंवा धर्मसापेक्ष, अशा ईश्वरी राज्याची स्थापना करणे अपरिहार्य आहे. (संतांनी आणि निःस्वार्थी साधकांंनी जनतेची ऐहिक अन् पारमार्थिक उन्नती साधून समाजव्यवस्था उत्तम राखण्यासाठी अध्यात्माच्या आधारे स्थापन केलेले सत्त्वगुणाधिष्ठित धर्मराज्य (रामराज्य) म्हणजे ईश्वरी राज्य.) श्रीराम, श्रीकृष्ण आणि अगदी अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मावर आधारित राज्य स्थापन केले होते, हे लक्षात येईल.
धर्मपालन ही वृत्ती होण्यासाठी काय करावे ?
प्रत्येक व्यक्तीचे जसे व्यक्तीगत जीवन असते, तसेच ती ज्या संघात (समाजात) रहाते, त्याचे सांघिक (सामाजिक) जीवनही असते. माणूस संघप्रिय असतो, पण शिस्तप्रिय नसतो; म्हणून त्याच्या वैयक्तिक जीवनासह सांघिक जीवनही उत्तम रहावे आणि संघाचे अस्तित्व टिकावे, यासाठी ईश्वराने काही नियम घालून दिले आहेत, त्याला ‘धर्म’ असे म्हणतात. व्यष्टी आणि समष्टी साधना करतांना अशा नियमांचे पालन करणे अतिशय महत्त्वाचे ठरते, उदा. एखादी वस्तू योग्य जागीच ठेवणे, इतरांचा विचार करणे, निरोप वेळच्या वेळी देणे, कार्यपद्धतीचे पालन करणे वगैरे. दायित्वशून्यता, हट्टीपणा, अप्रामाणिकपणा वगैरे स्वभावदोषांमुळे व्यक्तीकडून अशा नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे संघातील किंवा समष्टीतील सर्वांनाच त्रास होतो. स्वभावदोषांमुळे समाजव्यवस्था बिघडते आणि सांघिक कार्यावरही दुष्परिणाम होतो; म्हणून या नियमांचे पालन, म्हणजे धर्मपालन करणे आवश्यक आहे. धर्मपालनासाठी स्वयंशिस्त आवश्यक असते. स्वभावदोष-निर्मूलनामुळे स्वयंशिस्त अंगी बाणवण्यास साहाय्य होते. त्यामुळे कार्यपद्धतीचे पालन करण्याचा संस्कारच अंतर्मनात होतो आणि धर्मपालन ही वृत्तीच होऊ लागते.
यावरून धर्मपालन आणि स्वभावदोष-निर्मूलन हे परस्परपूरक आहेत, हे लक्षात येईल.