सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीचे आयोजन
कुडाळ – सध्या चालू असलेल्या दळणवळण बंदीच्या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘आपत्काळ आणि साधना’ या विषयावर ११ एप्रिल या दिवशी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ सत्संगाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून सनातन प्रभात नियतकालिकांचे वाचक, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ असे १०० हून अधिक, तर ‘यूट्यूब’च्या माध्यमातून ६८० हून अधिक जिज्ञासूंनी सत्संगाचा लाभ घेतला.
समाजाला सात्त्विक बनवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ! – सद्गुरु सत्यवान कदम
या वेळी सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी कालमहात्म्यानुसार व्यष्टी साधनेसह समष्टी साधना कशी आवश्यक आहे ? आपत्कालीन परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी समाजाला सात्त्विक बनवण्यासाठी साधनेकडे वळवणे कसे आवश्यक आहे, याविषयीही त्यांनी सांगितले.
आपत्कालीन स्थितीला सामोरे जाण्यासाठी विविध उपाययोजनांसह साधना करणे आवश्यक ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी सांगितले की, ‘सध्याच्या अभूतपूर्व अशा आपत्कालीन परिस्थितीविषयी अनेक संत, तसेच हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पूर्वीच भविष्य वर्तवले होते. अशा परिस्थितीत स्थिर रहाण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी सरकार सांगेल, त्या पद्धतीने योग्य ती काळजी घेणे आवश्यक तर आहेच; पण त्यासह भगवंताने आपले रक्षण करावे, यासाठी साधनाही करणे आवश्यक आहे.’
सत्संगाचा लाभ घेणार्या काही धर्मप्रेमींचे अभिप्राय
१. सौ. संध्या शेखर पवार, सावंतवाडी – सत्संगात मिळालेले मार्गदर्शन अतिशय महत्त्वाचे आहे. ‘ईश्वराची भक्ती म्हणजे नामस्मरण का करावे ?’, हे लोकांना कळले, तरच ते नामस्मरण करतील. ‘ईश्वर भक्तांचे नेहमीच रक्षण करतो’, हे जेव्हा लोकांना समजेल, त्या वेळी ते अत्यंत सद्भावनेने नामस्मरण करतील. या दृष्टीने सत्संगातील माहिती सर्वांसाठी दीपस्तंभासारखी मार्गदर्शक आणि भविष्यकाळाची जाणीव करून देणारे होते. ‘हे सर्व भगवंत त्यांच्याकडून करून घेत असावा’, असे वाटते. या मार्गदर्शनाविषयी अनेक अनेक धन्यवाद !
२. श्री. संदीप सावंत, इटली – सनातनचे साधक तथा शिक्षक श्री. शंकर राऊळ यांचे विद्यार्थी आणि विज्ञापनदाते श्री. संदीप सावंत यांचे मूळ गाव कारीवडे (तालुका सावंतवाडी) आहे. ते नोकरीनिमित्त सध्या इटलीमध्ये असल्याने त्यांना कार्यक्रमाची लिंक पाठवली. सत्संग ऐकल्यानंतर श्री. सावंत म्हणाले, ‘‘सत्संग अतिशय चांगला वाटला. अशा पद्धतीचे कार्यक्रम पुन्हा असतील, तर मला कळवल्यास आम्ही ते ऐकू.’’
३. श्री. राहुल प्रदीप गवळी, नाशिक – समितीमुळे ऑनलाईन सत्संग लाभला. अत्यंत चांगले वाटले. असे मार्गदर्शन सध्याच्या स्थितीत सर्वांना मिळणे आवश्यक आहे. श्री. मनोज खाडये यांनी ओघवत्या आणि संयमी भाषेत आपत्कालीन परिस्थितीची जाणीव करून दिली. सद्गुरु सत्यवान कदम यांच्या मार्गदर्शनातून ‘नामजप’ साधनेचे महत्त्व समजले. ‘साधनेचे प्रयत्न करून आपण आता वाटचाल केली पाहिजे’, याची जाणीव झाली. पुन्हा अशा सत्संगात सहभागी व्हायला आवडेल.
४. श्री. अमोल नामदेव चिने, नाशिक – सत्संगाचा लाभ भगवंताच्या कृपेने घेता आला, याचा आनंद झाला. सद्गुरु सत्यवान कदम आणि श्री. मनोज खाडये यांचे आपत्काळाविषयीचे मार्गदर्शन बहुमूल्य होते. आपत्काळ का येतो ?, हे समजले. सर्वांच्या इच्छेप्रमाणे लवकरच हिंदु राष्ट्राची सोनेरी पहाट निश्चितच उगवणार आहे, यात तीळमात्र शंका नाही. या आपत्काळातून आपण, आपले राष्ट्र लवकरच बाहेर पडू आणि विश्वकल्याणार्थ हिंदु राष्ट्राची उभारणी करण्यासाठी सज्ज झालेलो असू.