नवी मुंबई – दळणवळण बंदीमुळे इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचा अपलाभ घेत काही समाजकंटकांनी खोट्या लिंक संकेतस्थळ, व्हॉट्सअॅप किंवा अन्य प्रसारमाध्यमे यांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित करणे चालू केले आहे. यासंदर्भात नवी मुंबईतील नागरिकांनी सतर्क राहून अशा खोट्या ‘लिंक’ला बळी पडू नये, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
१. ‘प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता २०२०’मध्ये नोंदणी करून प्रत्येक मासाला साडेतीन सहस्र रुपये देण्याचे आमीष दाखवले जात आहे. तसेच ‘फ्री नेट फ्लिक्स’ ही ‘लिंक’ २० लोकांना किंवा ५ ‘ग्रुप’मध्ये पाठवल्यास ‘फ्री नेटफ्लिक्स’ मिळणार असल्याचे आमिष दाखवण्यात आलेले आहे. याद्वारेही नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
२. भ्रमणभाष सेवा पुरवणार्या काही आस्थापनांच्या नावांचा उपयोग करून ‘विनामूल्य ‘रिचार्ज’ असे संदेश प्रसारित करण्यात आले आहेत. याद्वारेही नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.
३. काही नागरिकांना भ्रमणभाष येऊन ‘तुमच्या इ.एम्.आय.ची मुदत वाढवून देण्यात येणार आहे. त्यासाठी तुमच्या भ्रमणभाषवर आलेला ‘ओटीपी’ क्रमांक ‘शेअर’ करा’, असे सांगून काही मिनिटांमध्येच त्यांच्या अधिकोष खात्यातील रक्कम काढली जाते. यासारख्या फसव्या लिंक प्रसारित करू नये, कोणाला आपला ‘ओटीपी’ सांगू नये, असुरक्षित संकेतस्थळ उघडू नये, असे आवाहन नवी मुंबई गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
४. यासंदर्भात संशयित लिंकविषयी नागरिकांनी www.reportphishing.in किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार करावी, असे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे.