Nagpur Violance : नागपूर हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार फहीम खान याला अटक !

खान हा ‘मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी’चा शहराध्यक्ष असून नितीन गडकरी यांच्या विरुद्ध लढवली होती लोकसभा निवडणूक !

नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खान

नागपूर : नागपूर हिंसाचाराचा सूत्रधार हा ‘मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी’चा शहराध्यक्ष फहीम खान आहे, असे पोलिसांनी प्रथमदर्शी नोंद केलेल्या अहवालात म्हटले आहे. या प्रकरणी खान याला अटक करण्यात आली असून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याने अनुमाने ५०० लोकांना एकत्र करून भडकावले. त्यामुळे गोंधळ आणि हिंसक संघर्ष निर्माण झाला. धर्मांधांनी कुर्‍हाड, दगड, काठ्या आणि इतर शस्त्रे वापरून दहशत निर्माण केली. खानच्या भाषणामागील उद्देश सामाजिक सलोखा बिघडवणे आणि धार्मिक तणाव निर्माण करणे हा होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी फहीम खानचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. त्याने वर्ष २०२४ ची लोकसभा निवडणूक नागपूर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात लढवली होती.

दंगलखोरांकडून महिला पोलीस अधिकार्‍यांचा विनयभंग !

प्रथमदर्शी अहवालानुसार अंधाराचा अपलाभ घेऊन ‘रॅपिड रेस्पॉन्स टीम’मधील एका महिला पोलीस अधिकार्‍याचा पोषाख खेचण्याचा प्रयत्न झाला, तर इतर महिला पोलीस अधिकार्‍यांना पाहून अश्‍लील हावभाव करण्यात आले आणि त्यांच्यावर अश्‍लील भाषेत टिपणी करण्यात आली. या प्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (महिला पोलीस अधिकार्‍यांचा विनयभंग करणार्‍यांना शरीयत कायद्यानुसार शिक्षा करण्याची कुणा मुसलमान नेते अथवा मुल्ला-मौलवी यांच्याकडून मागणी का केली जात नाही ? – संपादक)

अन्य घडामोडी !

१. नागपूर शहरात संचारबंदी असलेल्या २०० शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

२. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४६ संशयितांना अटक केली आहे. या संशयितांच्या विरोधात गणेशपेठ आणि तहसील पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे नोंद केले आहेत.

महिलांची छेड काढणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे करणार ! – आमदार डॉ. (सौ.) मनीषा कायंदे, शिवसेना नेत्या

आमदार डॉ. (सौ.) मनीषा कायंदे

काही प्रसारमाध्यमांतून आम्हाला कळले की, महिला पोलिसांसमवेत विनयभंग झाला आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही. गतवेळीही मुंबई येथे आझाद मैदान दंगलीच्या वेळी महिलांचा विनयभंग करण्याचा प्रकार झाला होता. अशा गोष्टी महाराष्ट्रात चालणार नाहीत. आम्ही या संदर्भात मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहोत, अशी माहिती शिवसेनेच्या महिला नेत्या आमदार मनीषा कायंदे यांनी दिली. त्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीत पत्रकारांशी बोलत होत्या.

संपादकीय भूमिका

फहीम खान याच्या पाठीशी कोण उभे होते, कुणाच्या आदेशाने त्याने ही दंगल घडवली, याची पाळेमुळे खणून काढून संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यांची नावे जनतेला सांगितली गेली पाहिजेत !