नागपूर दंगलीप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती !
मुंबई, १९ मार्च (वार्ता.) – पोलिसांवरील आक्रमण क्षम्य नाही. पोलिसांवर आक्रमण करणार्यांवर वेळेत कारवाई केली जाईल. काही लोकांनी औरंगजेबाची कबर जाळली आणि त्यामध्ये कुराणातील आयते जाळले, अशी अफवा जाणीवपूर्वक पसरवून दंगल घडवली, अशी नागपूर दंगलीविषयीची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १९ मार्च या दिवशी विधानसभेत गृह विभागाच्या अनुदानाच्या चर्चेवरील उत्तरात दिली.
पंचनाम्यांचे चित्रीकरण होणार, पोलिसांना टॅब देणार !
वर्ष २००८ ते २०१२ या कालावधीच्या तुलनेत वर्ष २०२४ मध्ये गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत पोचले आहे. हे प्रमाण ७५ टक्क्यांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी फॉरेन्सिक अनेलाईझ, ज्ञान साहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा आदी आधुनिक पद्धतींचा अवलंब केला जाणार आहे. गुन्हेगार सुटू नयेत, यासाठी यापुढे पंचनाम्यांचे चित्रीकरण केले जाणार आहे. चित्रीकरणासाठी पोलिसांना टॅब दिले जाणार आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
‘‘वर्ष १९९२ पासून नागपूर शांत आहे. काही लोक समाजात तणाव निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक अफवा पसरवत आहेत. त्यांवर कडक कारवाई केल्याविना थांबणार नाही. राज्यात अनेक आव्हाने असली, तरी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा आम्ही प्रयत्न करू.’’ – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस |
२४ घंट्यांत सायबर गुन्ह्याची उकल करण्याचा प्रयत्न !
सायबर गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी राज्यात ५१ सायबर लॅब सिद्ध करण्यात आल्या आहेत. नवी मुंबई येथे त्याचे मुख्य कार्यालय असेल. महाराष्ट्रातील सायबर गुन्हा शोधण्याच्या मुख्य कार्यालयाप्रमाणे कार्यालय सिद्ध करण्यासाठी ३ राज्यांनी आणि २ देशांनी मागणी केली आहे. तेथे जाऊन आम्ही त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन करू.
महिलांना तातडीने साहाय्य मिळण्यामध्ये देशात महाराष्ट्र दुसर्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर तेलंगाणा राज्य आहे. पुढील वर्षापर्यंत आम्ही तेलंगाणाप्रमाणे प्रतिसाद देण्याची वेळ साध्य करण्यासाठी प्रयत्न करू. वर्ष २०१५ ते २०२३ या कालावधीत ‘मुस्कान’ अभियानाच्या अंतर्गत ३८ सहस्र ९१० मुलींना घरी पोचवण्याचे काम महाराष्ट्र पोलिसांनी केले. याचे देशभरात कौतुक झाले. राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये ९९ टक्के बलात्कार ओळखीच्या व्यक्तींकडून झाल्याचे सिद्ध झाले आहे. पोलीस, प्रशासन आणि न्यायालय यांनी गतीने अन् समन्वयाने काम केल्यास बलात्कारांचे खटले लवकर निकाली निघू शकतील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.