कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आत्मबळ वाढवण्याची आवश्यकता  ! – श्री श्री रविशंकर, आर्ट ऑफ लिव्हिंग

मुंबई – कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आत्मबळ वाढवण्याची आवश्यकता आहे. मनात भीती निर्माण झाली, तर रोगप्रतिकारशक्ती न्यून होते. त्यामुळे आपल्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सध्या घरी बसावे लागत असल्याने याला शिक्षा न समजता संधी समजा आणि तिचा स्वतःसाठी लाभ करून घ्या, असे मार्गदर्शन ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी नियमित लिंबूपाणी घ्यावे. पांढरी साखर अधिक प्रमाणात खाल्ल्यानेही रोगप्रतिकारशक्ती न्यून होते. त्यामुळे गुळाचा उपयोग करावा. हळदीसमवेत काळी मिरी घेतल्यावर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. सकारात्मक मन शरीर निरोगी ठेवण्यास साहाय्य करते. ध्यान केल्याने मनातून नकारात्मकता दूर होते. ध्यान करण्याआधी मनाची सिद्धता असायला हवी, तर ध्यानाचा लाभ होईल; मात्र मनावर बळजोरी करू नका. ध्यान करतांना जे मनात येईल, ते स्वीकारा. यामुळे मनाला शांती मिळेल.