भाताविषयी बोलतांना बरेच रुग्ण नजर चुकवत हसत बोलतात, ‘रात्रीला मात्र मला थोडा तरी भात लागतोच’ किंवा ‘मी कोकणातून आहे हो, भात खायला लागतोच, चालेल ना थोडा भात खाल्लेला ?’ त्यांच्या असे विचारण्यात किंवा सांगण्यात नेहमी एक थोडा अपराधीपणा, एक ताण असतो. ‘आता डॉक्टर आपल्याला भात खातो; म्हणून रागावणार’, अशी काहीशी भावना बहुतेक जणांची असते.
भात खरच इतका वाईट आहे का ? आपले पूर्वज वर्षानुवर्षे भात खात आहेत, त्यांना तो पचतही होता. खरच सध्या वाढलेल्या मधुमेह, ‘कोलेस्ट्रॉल’ आणि वजन वाढणे यांमागे एकमेव भात हेच कारण आहे का ? भात बंद केल्यावर गोळ्या न घेता हे त्रास सहज आटोक्यात आलेले दिसतात का ? कि यामागे तो बनवण्याची पद्धत, व्यायाम नसणे, रात्रीला उशिरा जेवण होणे, भातासह बाकी जेवणही भरपेट करणे या गोष्टीही कारणीभूत असतील ? कुठल्याही तर्कशुद्ध मेंदूला यातील तथ्य लगेच समजेल. यासाठी पुढील काही सूत्रे लक्षात घ्यायला हवीत.
१. तांदूळ मुळात पचायला हलका आहे. कुकरमधील भात हा त्यातील पेज तशीच राहिल्याने पचायला जड असतो.
२. किमान वर्षभर जुने तांदूळ विकत आणावे किंवा नवीन आणून जुने करायला ठेवावेत. नवीन तांदूळ हा जुन्या तांदूळपेक्षा जड आणि चिकटपणा वाढवणारा असतो.
३. जुने तांदूळ धुवून भाजून वापरले, तर ते पचायला अजून हलके होतात.

४. तांदूळ धुवून अंदाजे ४ ते ६ पट पाण्यात झाकण न ठेवता पाण्यात उकळून पेज काढून भात शिजवावा. पेज दुसर्या पदार्थात थोडी थोडी वापरावी. अशाने तो पचायला हलका होतो.
५. भातासह भाजी, डाळ, व्यंजन असा बाकी आहारही असावा. डाळ अर्धवट सोललेल्या सालीसह असलेल्या डाळींची केली, तर अजून चांगले आहे. त्यावर काहीतरी स्निग्ध पदार्थ शक्यतो तूप नक्की असावे.
६. रात्री उशिरा जेवण असेल, तर अशा पद्धतीत केलेला भात, मुगाचे वरण आणि भाजी हा चांगला हलका जेवणाचा पर्याय आहे.
७. सध्याची आहार-विहार शैली बघता एका जेवणात एकच धान्य खावे, म्हणजे पोळी / भाकरी / भात. अशाने पिष्टमय पदार्थांचा ताण एकाच वेळी येत नाही.
८. लांब दाणेदार तांदूळ सतत खाण्यापेक्षा छोट्या दाण्याचे साठे साळी, आंबेमोहोर, तुकडा किंवा वाडा कोलम आपल्या पचनानुसार खाल्लेला बरा.
अशा पद्धतीत शिजवलेला फक्त भात, डाळ, ताकातील पालेभाजी, फळभाजी काही दिवस केवळ हा आहार कमी न होणार्या वजनाचा भार पटकन पार करायला साहाय्य करते, हा माझा अनुभव आहे.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे.