नाशिक येथे विनाकारण दुचाकी रस्त्यांवर आणल्यास पुढील ३ मासांसाठी दुचाकी जप्त होणार


नाशिक –
दळणवळण बंदीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात वारंवार सांगूनही दुचाकींचा वापर सर्रास चालूच असल्यामुळे आता विनाकारण कोणी दुचाकी रस्त्यांवर आणल्यास पुढील ३ मासांकरिता दुचाकी जप्त होणार आहे. ‘अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा विनाकारण रस्त्यावर येऊ नका’, असे आवाहन पोलीस, जिल्हा प्रशासन यांच्याकडून वारंवार केले जात आहे. दुचाकीस्वारांना केवळ एका वेळेस १०० रुपयांचे पेट्रोल देण्याच्या सूचनाही पेट्रोलपंपचालकांना दिल्या गेल्या आहेत. तरीही बहुतांश भागात दुचाकींचा वापर अल्प होत नसल्याने पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी कलम १४४ आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायदा कलम १८८नुसार वरील निर्णय घेतला आहे. रुग्णालयाच्या कामासाठी घराबाहेर पडणार्‍यांवर ही कारवाई होणार नाही. (पोलिसांच्या आवाहनाला वाहनधारकांनी प्रतिसाद द्यावा, अन्यथा त्यांच्यावर पोलिसांकडून अशी होणारी कारवाई योग्यच आहे ! – संपादक)