नवी देहली – कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणार्या भारतातील डॉक्टरांसाठी संरक्षक कवच म्हणून ‘हजमत सूट’ (पोशाख) देशातच सिद्ध करण्यात येणार आहे. सध्या अनेक देशांत या पोशाखाचा वापर केला जातो. ‘इबोला’, ‘कोरोना’ यांसारख्या विषाणूंचे संक्रमण झालेल्या रुग्णांवर उपचार करणारे आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांच्यासाठी हा पोशाख संरक्षक कवच असतो.
हजमत सूट (पोशाख) म्हणजे काय ?
‘हजमत सूट’ हे ‘हजार्डस मटेरियल’च्या पोशाखाचे संक्षिप्त नाव आहे. या पोशाखाने संपूर्ण शरीर झाकता येते. हा सूट घातक पदार्थ, रसायने आणि जैविक धोकादायक गोष्टी यांपासून आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांचे रक्षण करतो. डॉक्टर आणि परिचारिका हे केवळ रुग्णांवर उपचार करतांनाच हा पोशाख परिधान करतात. यासमवेत चष्मा, ग्लोज आणि अंगरखा (गाऊन) हेही परिधान केले जाते. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नुकताच हाच पोशाख परिधान करून कोरोनाग्रस्त रुग्णांची पाहणी केली होती.