१. उजवा पाय कापण्याऐवजी डावा पाय कापल्याप्रकरणी आधुनिक वैद्याला दंड
‘नवी देहली येथील फोर्टीस हॉस्पिटलमधील अस्थीरोगतज्ञाने शल्यकर्म करतांना एका रुग्णाचा उजवा पाय कापण्याऐवजी डावा पाय कापला. त्यामुळे वर्ष २०१६ मध्ये पीडित रुग्णाने हानीभरपाई मिळण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक मंचामध्ये याचिका केली. शल्यकर्म करण्यापूर्वी पीडित रवि राय (वय २४) याचे विविध प्रकारचे क्ष-किरण अहवाल (एक्स रे) काढले होते. शल्यकर्मासाठी नेतांनाही त्याच्या धारिकेवर उजव्या पायाचे शल्यकर्म करायचे आहे, असे नमूद होते. प्रत्यक्षात आधुनिक वैद्य (डॉ.) काकरन यांनी शल्यकर्म करतांना डावा पाय कापला. चूक लक्षात येताच अस्थीरोग तज्ञ रुग्णालयातून परागंदा झाले. त्यानंतर रुग्णाला दुसर्या रुग्णालयातून उपचार करून घ्यावे लागले.

२. आधुनिक वैद्य आणि रुग्णालय यांना झालेला १ कोटी १० लाखाचा दंड रहित करण्यास सर्वाेच्च न्यायालयाचा नकार
त्यामुळे वर्ष २०१६ मध्ये रवि राय याने आधुनिक वैद्य आणि रुग्णालय यांच्याकडून हानीभरपाई मिळण्यासाठी याचिका प्रविष्ट केली. रुग्णाच्या म्हणण्यानुसार त्याच्या उजव्या पायाला ईजा झाली होती आणि तो कापायचे ठरले होते. असे असतांना शल्यकर्म करणार्या आधुनिक वैद्याने त्याचा डावा पाय कापला. या प्रकरणी रुग्णाने ग्राहक मंचाच्या माध्यमातून हानीभरपाईची मागणी केली. त्यानुसार ग्राहक मंचाने रुग्णाला १ कोटी १० लाख रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश दिला. हे प्रकरण सर्वाेच्च न्यायालयापर्यंत गेले. सर्वाेच्च न्यायालयाने आधुनिक वैद्य आणि फोर्टीस हॉस्पिटल यांना ठोठावलेल्या दंडाचा आदेश रहित करण्यास नकार दिला, तसेच त्यांची याचिकाही असंमत केली.
३. रुग्णाला जन्मभरासाठी आंधळे करणार्या आधुनिक वैद्यांचा हलगर्जीपणा
तेलंगाणामध्ये एका रुग्णाच्या डोळ्याला कर्करोगाची बाधा झाली होती. त्यामुळे तो डोळा काढण्याचा निर्णय झाला. त्यासाठी त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे शल्यकर्म करणार्या आधुनिक वैद्याने बाधित डोळा काढण्याऐवजी निरोगी डोळा काढला. त्यामुळे रुग्णाला दुसर्या रुग्णालयात जाऊन शल्यकर्म करून कर्करोगाने बाधित डोळा काढावा लागला. परिणामी त्या मुनष्याला अंधत्व आले. त्याच्या आंधळेपणासाठी एका आधुनिक वैद्याचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरला.
४. आधुनिक वैद्याचा विसरभोळेपणा महिलेच्या प्राणावर बेतला !
प्रसुतीचे शल्यकर्म करतांना आधुनिक वैद्य हे महिलेच्या पोटात कात्री विसरले. काही मासांनी त्याचा तिला त्रास व्हायला लागला. त्यानंतर पुन्हा पोटाचे शल्यकर्म करून कात्री काढावी लागली. अन्य एका प्रकरणात महिलेच्या बाळंतपणात त्या शल्यकर्मासाठी वापरलेली कात्री महिलेच्या पोटात राहिली. त्यामुळे तिला प्राणाला मुकावे लागले.
५. कर्नाटकात प्रसुतीसाठी आलेल्या ५ महिलांचा मृत्यू
कर्नाटकात रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या ५ महिलांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी समिती नेमून चौकशी करण्याचे आश्वासन दिले. चौकशी केल्यानंतर दोषी लोकांना कदाचित शिक्षा होईलही; परंतु आधुनिक वैद्यांच्या निष्काळजीपणाने या महिलांचे गेलेले प्राण परत येणार आहेत का ?, हा खरा प्रश्न आहे.
६. आरोग्य सेवेचा व्यापार
कधीकाळी आधुनिक वैद्यांच्या व्यवसायाला ‘नोबेल व्यवसाय’ संबोधले जात होते; परंतु गेली काही दशके आधुनिक वैद्य आणि रुग्णालये यांनी आरोग्य सेवेचा व्यापार चालू केला आहे. अनेकदा रुग्णाला रुग्णालयात भरती केले की, प्राणवायू, व्हेंटिलेटर, अतीदक्षता विभाग इत्यादींच्या नावाने लाखांची देयके काढली जातात. रुग्णाचा प्राण वाचला किंवा गेला, तरी रुग्णाच्या नातेवाइकांना लाखांची देयके भरावी लागतात. अनेक हालअपेष्टा सहन करूनही फारच थोडे रुग्ण ग्राहक मंच, न्यायालय किंवा पोलीस ठाणे यांची वाट धरतात; कारण तेथील अनुभवही काही वेगळा नसतो. जनतेच्या दृष्टीने पोलीस ठाणे, न्यायालये आणि रुग्णालये यांच्या संदर्भातील सर्वच अनुभव कटू असतात.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (७.१२.२०२४)