परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वर्ष १९९० पासून अध्यात्मप्रसाराचे कार्य चालू केले. त्या अंतर्गत त्यांनी ‘आनंदप्राप्तीसाठी साधना’, या विषयावर अभ्यासवर्ग घेणे, विविध ग्रंथांचे संकलन करणे, अनेक मोठी प्रवचने करणे’, असे विविध मार्ग अवलंबले आहेत. आरंभापासून ‘जिज्ञासूंच्या शंकांचे निरसन करणे आणि ‘चांगला साधक कसे व्हावे ?’, याविषयी मार्गदर्शन करणे’, हा त्यांच्या कार्याचा एकमेव उद्देश होता. ‘साधकांच्या साधनेसंबंधी अडचणी समजून घेणे आणि त्यांचे निराकरण करून उपाय सांगणे’, हे त्यांच्या कार्याचे एक अविभाज्य अंग आहे. ‘बाळ बोबडे जरी बोले, बोल जननीस ते कळे ।’, या उक्तीप्रमाणे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साधकांच्या साधनेसंबंधी अडचणी लगेच कळतात आणि ते त्यांना अचूक उपायही सांगतात’, अशी अनुभूती अनेक साधकांनी घेतली आहे.
(भाग ३)
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/893074.html

८. समष्टी साधनेचे महत्त्व
८ उ. इतरांना साधना शिकवणे, ही समष्टी साधना असल्याने त्यात अधिक बोलावे लागले, तरी त्यातून ऊर्जा मिळते !
एक साधिका : अधिक बोलण्याने ऊर्जा खर्च होते आणि आपण नामापासूनही विचलित होतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : अधिक बोलणे कशाबद्दल आहे ? आपण समष्टी साधना करत आहोत. इतरांनाही आपण साधनेचे महत्त्व इत्यादी सांगत असलो, तर त्याच्यात ऊर्जा खर्च होत नाही. उलट त्याच्यात ऊर्जा मिळते; कारण आपण समष्टी साधना करत आहोत.
८ ऊ. ‘घरातील व्यक्तींशी चांगले वागणे आणि रुग्णाईत व्यक्तींची सेवा करणे’, ही समष्टी साधना नसून कर्तव्य आहे !
एक साधिका : ‘मी घरातील व्यक्तींशी चांगली वागते. कुटुंबातील व्यक्ती रुग्णाईत असतांना त्यांची सेवा करते. तसेच ‘घरातील कामे करतांना ईश्वर त्या माध्यमातून आपली समष्टी साधना करून घेत आहे. आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी’, असा भाव ठेवून प्रत्येक कृती केली, तर त्यातून ‘समष्टी साधना’ होऊ शकते का ? ते समष्टीचे लहान रूपच असते का ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : घरात समष्टी सेवा होत नाही. ते कर्तव्य झाले.
८ ए. नोकरीच्या ठिकाणी असलेल्या व्यक्तींना साधना सांगितल्यास थोडी समष्टी साधना होते !
एक साधिका : मी रुग्णालयात काम करते. ‘नोकरी हे ईश्वराने मला दिलेले ‘ईश्वरप्राप्तीचे साधन’ आहे’, असा भाव ठेवून तेथील कार्य मी सेवाभावाने करत असेन, तर त्यातून माझी ‘समष्टी साधना’ होऊ शकते का ? मी रुग्णांची प्रत्यक्ष सेवा करत नाही. मी रुग्णालयात रुग्णांशी संबंधित काम ‘सेवा’ म्हणून करते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : मग ती नोकरीच झाली ! जी कामे आहेत, ती मी केली. तुम्ही प्रत्येकाशी बोलतांना साधनेविषयी काहीतरी बोलता का ? नोकरीच्या ठिकाणी संपर्कात येणार्या लोकांना साधना सांगून ‘त्यांच्याकडून साधना होते का ?’, याकडे तुमचे लक्ष असते का ?
एक साधिका : माझ्या संपर्कात येणार्या व्यक्तींशी माझे साधनेविषयीच बोलणे होते, म्हणजे ‘ते कोणता नामजप करतात ?’ मी त्यांना ‘आता ईश्वरी राज्यामध्ये नागरिक होण्यासाठी पात्र व्हावे’, यासाठी आमच्याकडून साधना करून घे’, अशी प्रार्थना करायला सांगते. त्यातून ‘समष्टी साधना’ होते का ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : होते; पण अगदी थोडी होते. अन्य समष्टी साधना करणार्या लोकांना पाहिलेत का ? रात्रंदिवस ते समष्टी साधनाच करत असतात. तसे नोकरीच्या ठिकाणी काही जणांना साधना सांगितली. भेटले त्यांना सांगितले, तर अगदी थोडी समष्टी होते. तुम्ही हळूहळू समष्टी साधना वाढवा.
८ ऐ. ज्या व्यक्तीची आरंभापासून समष्टी साधनेविषयी ओढ आहे, तिने व्यष्टी आणि समष्टी अशा दोन्ही साधना एकाच वेळी करणे आवश्यक !
एक साधक : नमस्कार ! तुम्ही म्हणालात, ‘‘आधी व्यष्टी साधना करून मग समष्टी साधना करा. आता व्यष्टी साधना आधी करायची, मग समष्टीकडे जायचे कि व्यष्टी साधना आणि समष्टी साधना दोन्ही एकाच वेळी करायच्या ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : एकत्र करा ! ज्याचा समष्टी साधना करण्याचा कलच नाही, त्याने प्रथम व्यष्टी साधना करावी. ती परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करावा आणि मग समष्टी साधना करावी. ज्याची आरंभापासून समष्टी साधनेकडे ओढ आहे, त्याने व्यष्टी साधना आणि समष्टी साधना एकत्रच करावी.
९. प्रार्थना न करताही देवाने देण्यासाठी आपण सर्वांना साधना शिकवत जाणे आवश्यक !
एक साधिका : आपली दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आकाशओळ येते, ‘देवाला प्रार्थना करायची वेळही न येता देव आपल्याला देतो.’ त्यासाठी आपली किती पात्रता असायला पाहिजे ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : तेवढी पात्रता निर्माण होण्यासाठी साधना करून आध्यात्मिक पातळी वाढवली पाहिजे. आध्यात्मिक पातळी न्यूनतम ६० टक्क्यापर्यंत तरी पोचायलाच हवी.
१०. बाह्यमन अंतर्मनात विलीन होईपर्यंत, म्हणजे ७० टक्के आध्यात्मिक पातळी (संतपद प्राप्त) होईपर्यंत स्वयंसूचना देणे आवश्यक !
एक साधिका : आपली ऊर्जा वाचवण्यासाठी आपल्याला सूत्रबद्धच (मुद्देसुदच) बोलायचे असेल, तर त्यासाठी स्वयंसूचना घेणे आवश्यक आहे का ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : पुढे आपोआप होऊ लागते. स्वयंसूचना, म्हणजे अंतर्मनाने बाह्यमनाला शिकवले. साधना करता करता बाह्यमन अधिक उरतच नाही. ते अंतर्मनातच विलिन होते आणि अंतर्मनातच सगळे योग्य विचार चालू असतात. मग तेच कार्य करतात.
साधिका : बाह्यमन नष्ट झाल्यावर स्वयंसूचनेची गरज नाही ? योग्य विचार आपोआपच येतात ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हो, ६० – ६५ टक्क्यांच्या पुढच्या पातळीला गेलो की, ते होऊ लागते. ७० टक्के पातळी झाली, म्हणजे आपण संत झालो, तर मग काही विचारच करायला नको.
११. विशिष्ट टप्प्यापर्यंत कुलदेवतेचे नामस्मरण केल्यावर पुढच्या टप्प्याला जाण्यासाठी आवश्यक तो नामजप करावा !
एक साधिका : पूर्वी आपण सांगितले होते की, अनेकातून एकात यायचे. तेव्हा आपण ‘श्री गुरुदेव दत्त’ आणि ‘कुलदेवतेचे’ ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ असे नामस्मरण करायचो; पण आता आपण उपाय करून स्वतःचाच नामजप शोधून काढतो. हे कसे ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आपण कुलदेवतेचा नामजप का करतो ? त्या विशिष्ठ कुळात जन्माला का आलो आहे ? तर आपल्याला त्या देवतेची साधना आवश्यक आहे म्हणून. आतापर्यंत ती केली; पण आता आपल्याला आणखीन पुढे जायचे आहे.
एक साधिका : म्हणजे हे नामस्मरण आता समष्टीसाठी ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : व्यष्टी-समष्टी दोन्ही. आपले कितीतरी जन्म झाले आहेत. प्रत्येक कुळात निरनिराळ्या कुलदेवता होत्या. त्यामुळे आपण त्यांचा विचार करायचा नाही. शेवटी आपल्याला व्यष्टी विसरायचीच आहे. समष्टीच ! तुम्ही करता ती सेवा समष्टीतीलच आहे ना ? ईश्वर तात्पुरता कुणासाठी किंवा आपल्या भक्तासाठी करतो काहीतरी; पण खरी समष्टी ! त्याचे कार्य समष्टी कार्य !
१२. आदर्श व्यक्तींप्रमाणे ‘मलाही इतरांसाठी कष्ट घ्यायचे आहेत’, असा दृष्टीकोन आवश्यक !
एक साधक : नशिबाचा भाग म्हणून मी या संस्थेशी जोडले गेलो. तुम्हा दोघांचे दर्शन लाभले. तेव्हा एक घटना आठवते की, ७०० वर्षापूर्वी संत ज्ञानेश्वरांची ४ भावंडे ईश्वराने जगासाठी दिली. तशीच आज आठवले कुटुंबाची या ना त्या स्वरूपामध्ये डॉक्टर म्हणा किंवा तुम्ही अध्यात्मातले म्हणा. म्हणजे आमचे हे अहोभाग्य आहे. ईश्वर काळजी कशी घेतो ?, तर त्या वेळेला असंख्य त्रास होऊन सुद्धा चारही भावंडांनी ‘आता विश्वात्मके देवे’ व्यापक असे वरदान मागितले आणि तुमच्या शिकवणीमध्येसुद्धा हे केवळ भारतातील किंवा महाराष्ट्रातील नसून जगामधल्या सगळ्या मानवजातीचा आनंद आहे. तुम्ही दोघे संमोहन उपचारतज्ञ म्हणून डॉक्टर आहात, म्हणजे ‘तुम्ही मानवजातीला आनंद देणारे डॉक्टर आहात’, असे मला जाणवते. आजच्या काळात आम्ही स्वतःला धन्य समजतो. याच्याबद्दल कृतज्ञता वाटते. तुम्हालासुद्धा काही कमी त्रास झालेले नाहीत.
सावरकर काय ? ज्ञानेश्वर काय ? त्यांना ज्या असंख्य अडचणींतून जावे लागले, तशाच अडचणींतून आपल्यालाही समाजाला चांगले मार्गदर्शन करत असूनही भोगावे लागले. तेव्हा कधी कधी माझी आई देवद संकुलामध्ये असायची. दैनिक वाचनाची सेवा करून आली की म्हणायची, ‘‘बघ रे ! बाबा तो देव माणूस समाजासाठी काय करतोय आणि हे लोकं त्यांना काय पीडत आहेत.’’ असे तिच्या अंतःकरणातून यायचे की, चांगले करायला गेले, तरी किती संकटे आणि अडचणी आहेत. असे असूनही आपला दृष्टीकोन असाच आहे की, भारतातच नव्हे, तर संपूर्ण मानवजातीला आनंद कसा मिळेल ?, म्हणजे ‘तुम्ही केवळ त्या व्यवसायापुरते डॉक्टर नसून विश्वातल्या मानव जातीला आनंद देणारे डॉक्टर आहात’, असे जाणवले. ईश्वराने ते नियोजन केले आणि आम्ही त्या दृष्टीने जोडले गेलो, त्यासाठी आम्ही स्वतःला कृतज्ञ आणि भाग्यवान समजतो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : दुसर्यांचे वर्णन करण्यापेक्षा ‘असे आपल्याला स्वतःला व्हायचे आहे’, असा दृष्टीकोन असावा. त्या दृष्टीने सर्व प्रयत्न केले की, आपणही तसे झालो.
(क्रमश:)