कोरोनाशी लढण्यासाठी रतन टाटा यांच्याकडून ५०० कोटी रुपये देण्याची घोषणा

अन्य उद्योगपतींकडूनही साहाय्य घोषित

नवी देहली – कोरोनाशी लढण्यासाठी ‘टाटा ट्रस्ट’चे अध्यक्ष रतन टाटा यांनी ‘पंतप्रधान साहाय्यता निधी’साठी तब्बल ५०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली. साहाय्यासाठी आजपर्यंत जमा झालेल्या रकमेपैकी ही रक्कम सर्वाधिक आहे. या समवेत ‘टाटा समूहा’ने त्यांच्याकडे पूर्णवेळ आणि कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना मार्च अन् एप्रिल मासांचे पूर्ण वेतन देण्याचाही निर्णय घेतला आहे.

उद्योगपतींनी घोषित केलेले साहाय्य

१. उद्योगपती राहुल बजाज यांनी कोरोनाशी लढण्यासाठी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. याचसमवेत कोरोनासाठी लागणारी संसाधनेही ते उपलब्ध करून देणार आहेत.

२. ‘हिरो मोटर्स’चे अध्यक्ष पंकज एम्. मुंजाल यांनी करोनाग्रस्तांसाठी १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.

३. ‘रिलायन्स इंडस्ट्रीज्’चे मुकेश अंबानी यांनी ‘मुख्यमंत्री साहाय्यता निधी’साठी ५ कोटी रुपयांचे साहाय्य केले. ‘रिलायन्स’ने मुंबईतील ‘सेव्हन हिल्स’ या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी १०० खाटांचे उपचारकेंद्र बनवले आहे.

४. ‘महिंद्रा अँड महिंद्रा’चे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनीही कोरोनाग्रस्तांसाठी ७ सहस्र ५०० रुपये मूल्याचे अत्याधुनिक ‘व्हेंटिलेटर’ सिद्ध करण्यात येत असल्याचे घोषित केले आहे.

५. ‘मारुति सुझुकी इंडिया लिमिटेड’ आस्थापन अन्य भागीदारी आस्थापनांसह ‘व्हेंटिलेटर’, ३ प्लायच्या मास्कची निर्मिती आणि अन्य वैद्यकीय उपकरणे यांची निर्मिती करणार आहे. या आस्थापनाने प्रतिमास १० सहस्र ‘व्हेंटिलेटर’ बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

अन्य आस्थापनांनी केलेल्या घोषणा

१. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचे आस्थापन असलेल्या ‘कॉग्निझंट’ने  भारतातील ‘असोसिएट’ दर्जाच्या आणि त्याखालील पदांवरील एकूण १ लाख ३० सहस्र कर्मचार्‍यांना एप्रिलच्या वेतनासह २५ टक्के अतिरिक्त वेतन देणार आहे.

२. ‘रिलायन्स इंडस्ट्रिज्’ १५ सहस्र रुपयांहून अल्प वेतन असणार्‍या कर्मचार्‍यांना मासातून २ वेळा वेतन देणार.

३. भ्रमणभाष सेवा देणार्‍या ‘एअरटेल’ आस्थापनाने त्यांच्या कर्मचार्‍यांना मार्चचे वेतन दिले आहे.