इराणी व्यक्ती नगर येथून पसार झाल्याप्रकरणी सिंग रेसिडेन्सी उपाहारगृहच्या मालकासह तिघांवर गुन्हा नोंद

नगर – शहरातील तारकपूर परिसरात असलेल्या सिंग रेसिडेन्सी उपाहारगृह येथे २४ मार्च या दिवशी ईराज रेझई (वय ४८ वर्षे) या नावाची इराणी व्यक्ती स्वत:ची ओळख लपवून ६ घंटे राहून निघून गेली. कोरोनाचा प्रादुर्भाव असतांना परदेशी नागरिकांची माहिती पोलिसांना कळवणे बंधनकारक आहे. तरीही या उपाहारगृहाच्या व्यवस्थापनाने याविषयी प्रशासनाला कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे तोफखाना पोलिसांनी या उपाहारगृहाचे मालक कवलजीत सिंग गंभीर, व्यवस्थापक रूपेश सोहनलाल गुलाटी आणि ईराज हुसेन रेझई यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. (सध्या कोरोनाची साथ असल्याने असे गुन्हे करणार्‍यांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित ! – संपादक) 

सिंग रेसिडेन्सी उपाहारगृह येथे खोली नोंद करतांना ईराज रेझई याने स्वतःचे नाव सांगून इराण येथील तेहरान येथून आल्याचे सांगितले. या उपाहारगृहाच्या व्यवस्थापनाने त्याच्याकडून ओळखपत्रही घेतले नाही, तसेच त्याच्या वाहनाचा क्रमांकही नोंदवला नाही.  या इराणी व्यक्तीने खोलीची नोंद करतांना नोंदवलेला भ्रमणभाष क्रमांक बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे.